जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना लस दिल्याचा आरोप; श्रीगोंद्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ - Allegations of vaccinating people outside the district; Confusion at the vaccination center in Shrigonda | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना लस दिल्याचा आरोप; श्रीगोंद्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ

संजय आ. काटे
शुक्रवार, 7 मे 2021

नगरपालिकेच्या पंतनगर भागातील सभागृहात आज 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. ज्यांनी ऍपवर नोंदणी केली होती, ते लस घेण्यासाठी सकाळीच केंद्रावर हजर होते.

श्रीगोंदे : शहरातील नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रात आज (ता. 7) जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना लस दिली जात असल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी (Public) गोंधळ घातला. त्यावर, ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना लस दिली जाईल, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाला रोषास सामोरे जावे लागले. त्यामुळे दुपारपर्यंत लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. (Allegations of vaccinating people outside the district; Confusion at the vaccination center in Shrigonda)

नगरपालिकेच्या पंतनगर भागातील सभागृहात आज 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. ज्यांनी ऍपवर नोंदणी केली होती, ते लस घेण्यासाठी सकाळीच केंद्रावर हजर होते.

लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांमध्ये अनोळखी चेहरे दिसल्याने स्थानिकांमध्ये त्याबाबत चर्चा सुरू झाली. "जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना लस कशी देता? प्रथम स्थानिकांचा विचार करा,' अशी मागणी होऊ लागली. 

या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी लस घेण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींची ओळखपत्रे तपासली. त्यांतील अनेक जण पुणे जिल्ह्यातील असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केंद्रावर गोंधळ सुरू झाला. बाहेरच्या जिल्ह्यातील व्यक्तींनी नियमाप्रमाणे नोंदणी केली असल्याने त्यांना लस देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. आक्रमक तरुणांशी चर्चा करून मार्ग काढत देवरे यांनी आजची मोहीम उरकून घेतली.

हेही वाचा...

आरोग्य कर्मचाऱ्यास धक्काबुक्की 

प्रशासनाच्या भूमिकेने विरोध मावळला 

जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींना, जिल्हाबंदी असतानाही प्रवेश मिळाल्याने स्थानिकांचा विरोध होता. त्यातच संबंधित यंत्रणेने या व्यक्तींची आरोग्य तपासणी झाली अथवा नाही, याचीही माहिती घेतली नाही. त्यामुळे भीतीपोटी गोंधळात भर पडली. मात्र, बाहेरील व्यक्तींना लस घेण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचे प्रशासनाने सांगितल्यावर स्थानिकांचा विरोध मावळला. 

आॅनलाईन नोंदणीमुळे नियोजन चुकले

ऑनलाइन नोंदणीमुळे कुठलीही व्यक्ती कुठेही नोंदणी करून लस घेऊ शकते, अशी मार्गदर्शक तत्त्वे असल्याने, सकाळच्या सत्रात नियोजन चुकले. मात्र, यापुढे त्यात सुधारणा करण्यात येईल. 
- मंगेश देवरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, श्रीगोंदे 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख