'तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का,'...अजित नवलेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल... - Akole Congress leaders angry over Balasaheb Thorat Ajit Navale | Politics Marathi News - Sarkarnama

'तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का,'...अजित नवलेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी थोरातांवर हल्लाबोल केला.

अकोले : ''मंत्री-संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का,'' असा सवाल करत सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.अजित नवले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल चढवला. थोरात यांच्या आढावा बैठकीत झालेला गोंधळाचा प्रकार योग्य नसल्याचा सूर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. मंत्री थोरात यांच्यामुळे तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.

रविवारी करोना आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्यानंतर सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी थोरातांवर हल्लाबोल केला.त्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह लावतानाच रेमडेसिवीर व ऑक्सीजन पुरवठ्यात दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

रेमडेसीवीर व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ज्यांचे आई बाप करोनामुळे तडफडून मरतील, त्या तरुणांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देतानाच संगमनेर तालुक्यात आमच्या विविध संघटनांचे कामगार आहेत, अशी आठवणही त्यांनी थोरातांना करून दिली आहे.

रविवारी अकोले येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या करोना आढावा बैठकीत गोंधळ झाला होता. या बैठकीबाबत डॉ. नवले यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. संगमनेरच्या तुलनेत अकोलेला रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल डॉ. नवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकोले येथे आंदोलन केले होते.

अकोले व संगमनेर असा वाद नाही, पण धाकट्या भावाच्या ताटात अधिक वाढणे ही मोठ्या भावाची जबाबदारी असते, याची आठवण त्यांनी थोरातांना करून दिली. संगमनेर मध्ये सर्वच काही अलबेल आहे, असेही काही नाही. मात्र, वेळ राजकारण करण्याची नाही. माणूस म्हणून उभे राहण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला तुम्हाला अधिकृतरित्या बोलावता येणार नाही. कोविड सेंटरचे संचालक म्हणून तुम्ही आले तर चालेल, असा निरोप आम्हाला अधिकारी देतात. ''मंत्री-संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का,'' असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, त्यांचा हा सोशल व्हिडिओ तालुक्यात व्हायरल झाला आहे. त्यांचा रोष नाव नाही घेतले तरी स्थानिक काँग्रेस नेत्यावर असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे 

बैठकीसाठी तासभर नामदारांची वाट पाहत बसलेल्या स्थानिक आमदारांना न सांगताच बैठक सुरू करण्यात आली, हे कोणाच्या सांगण्यावरून केले ? ज्यांनी कोरोना उपचाराबाबत आवाज उठवला, त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बैठकीत टाळण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला.
Edited by: Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख