परदेशात लस निर्यात केल्याचे दुष्परिणाम भारतात : जयंत पाटील यांची टीका - Adverse effects of vaccine exports to India: Criticism of Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

परदेशात लस निर्यात केल्याचे दुष्परिणाम भारतात : जयंत पाटील यांची टीका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

लसींचा उपयोग देशवासियांसाठी करण्याऐवजी परदेशात सुमारे साडेसहा कोटी लसींची निर्यात करण्यात आली. या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसत आहेत.

संगमनेर : कोरोना प्रतिबंधक लसीची देशात निर्मिती झाल्यानंतर सुरवातीच्या काळात त्या लसींचा उपयोग देशवासियांसाठी करण्याऐवजी परदेशात सुमारे साडेसहा कोटी लसींची निर्यात करण्यात आली. या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसत आहेत. या लसींमध्ये निम्मा महाराष्ट्र कव्हर झाला असता, त्यामुळे देशातील सर्व राज्यात कोवीडच्या लसींचे योग्य नियोजन करण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. (Adverse effects of vaccine exports to India: Criticism of Jayant Patil)

संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे निळवंडे प्रकल्पाच्या जलसेतूची पहाणी करण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक लसिकरण झालेले असतानाही राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावाने ओरडत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच केली होती. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की लस देण्याचे नियोजन केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, ते ढासळले आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांना वेळेत दुसरा डोसही मिळाला पाहिजे. याचे भान केंद्र सरकारला हवे.

दुसरी लस वेळेत मिळावी, तसेच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी तातडीने लसीकरण सुरु करावे, हा आमचा आग्रह आहे. देशात लस निर्माण करणाऱ्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने आवश्यकतेनुसार लसींचा साठा मिळत नाही. अन्यथा राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालये या सर्व व्यवस्थेतून महाराष्ट्र लसिकरणाचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनावर राज्यातील काही जिल्हे वगळता नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातही बाधीतांची संख्या कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी राज्य सरकार प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तौक्ते वादळामुळे झालेल्या हानीच्या पार्श्वभुमिवर मुंबईच्या समुद्रातील ओएनजीसीच्या बाज प्रकरणी राज्य सरकारवर ठपका ठेवीत आशिष शेलार यांनी टीका केल्याविषयी बोलताना ते म्हणाले, की हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारित चालते. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. वादळाबाबत आठ दिवस आगोदर पूर्वसूचना व इशारे देवूनही त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले नाही. पोलिस या प्रकरणातील जबाबदारांची सखोल चौकशी करीत असून, दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट राज्य सरकारवर टीका करण्यासाठी वापरणे योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
 

हेही वाचा..

खतांबाबत निर्णय योग्य

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख