अबब ! श्रीरामपूरमध्ये बनावट रेमडेसिव्हिर, रिकाम्या बाटलीत भरले सलाईनमधील पाणी - Abb! Fake remedivir in Shrirampur, water in saline filled in an empty bottle | Politics Marathi News - Sarkarnama

अबब ! श्रीरामपूरमध्ये बनावट रेमडेसिव्हिर, रिकाम्या बाटलीत भरले सलाईनमधील पाणी

गाैरव साळुंके
सोमवार, 19 एप्रिल 2021

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असतानाच बनावट इंजेक्शन तयार करण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाच अटक केली आहे.

श्रीरामपूर : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असतानाच बनावट इंजेक्शन तयार करण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाच अटक केली आहे.

उपचारासाठी रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात येथील एका कोरोनाबाधितला तात्काळ रेमडेसिव्हीरची गरज असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री केल्याप्रकरणी शहर पोलीसांनी एकाला अटक केली. रईस अब्दुल शेख (वय 20, रा. मातापुर, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने आरोपीला पुढील चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ रेमडेसिव्हीर मिळवून देतो, असे सांगून कोविड रुग्णालयातील डाॅक्टरांनी वापरुन कचरापेटीत फेकलेल्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यामध्ये सलाईनमधील पाणी भरुन रईस विक्री करीत होता.

बनावट रेमडेसिव्हिर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस पथकाने येथील नेवासे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासमोरुन त्याला पकडले. पोलीस ठाण्यात कसून चौकशी करुन बनावट रेमडेसिव्हिर विक्रीप्रकरणी रईस अब्दुल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपीने यापुर्वी किती बनावट इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना विकले. बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनमुळे कोणी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला का? याबाबत शहर पोलीसांनी अधिक तपास केला. त्यात बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याचा शेख यांचा पहिला प्रयत्न असून, 25 हजार रुपयांचा इंजेक्शन विक्री केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अर्जुन पोकळे, पोलीस नाईक संजय दुधाडे, किरण पवार, शरद वांढेकर यांनी केली.

 

हेही वाचा..

आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्या : पिचड 

अकोले : तालुक्‍यात कोविडचा संसर्ग वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन बेड, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता तत्काळ करून देण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनही अत्यल्प स्वरूपात मिळत आहे. पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत आहे.

जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत मात्र या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येत आहेत. अकोले तालुका हा आदिवासी, डोंगराळ, अतिदुर्गम व पेसा क्षेत्रात असून, खेड्यापाड्यांमध्ये विखुरलेला आहे. ऑक्‍सिजन बेड, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता तत्काळ होण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, अशी आग्रही विनंती पिचड यांनी केली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख