अजितदादांनी जिल्हा बॅंकेबाबत काय दिला 'कानमंत्र'? - What tips Ajit Pawar gave for Nagar District Bank Election | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी जिल्हा बॅंकेबाबत काय दिला 'कानमंत्र'?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

काल जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. त्या दरम्यान काही नेत्यांशी चर्चा होऊन बॅंकेवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कसे राहील, यासाठी त्यांनी कानमंत्र दिला असल्याचे मानले जाते.

नगर :  जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत दोन मतप्रवाह जिल्ह्यात आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील धुरिणांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांतील जागा बिनविरोध होण्याकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, काल जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. त्या दरम्यान काही नेत्यांशी चर्चा होऊन बॅंकेवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कसे राहील, यासाठी त्यांनी कानमंत्र दिला असल्याचे मानले जाते.

जिल्हा बॅंकेच्या २१ संचालकांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या बॅंकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी जोर धरीत आहे. पहिल्याच टप्प्यात बॅंकेच्या कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातील शेवगाव व राहाता येथील दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. याच मतदारसंघातील आठ जागा बिनविरोध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आणखी चार तालुक्‍यांतील जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

शेतीपूरक, तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था, बिगरशेती संस्था, इतर मागासवर्ग, महिला प्रतिनिधी मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असल्यामुळे, बिनविरोध निवडणुकीत अडथळे येत आहेत. इच्छुकांची भाऊगर्दी कमी करण्यासाठी सध्या जिल्ह्यातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना किती यश येते, हे ११ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

भाजपचे नेते गळाला?
जिल्हा बॅंकेत आतापर्यंत कॉंग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे आधिपत्य राहिले आहे. तथापि, या वेळी महाविकास आघाडीच्या हाती बॅंकेची सूत्रे राहण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न होत आहेत. त्यामध्ये या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे झाले. त्यामुळे या दौऱ्यात त्यांनी या निवडणुकीबाबत मोट बांधली असल्याचे मानले जाते. त्याचाच भाग म्हणून काही भाजप नेते गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख