राष्ट्रवादीत घेतलेले शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा : अजितदादांना नार्वेकरांचा फोन

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद पारनेरमुळे चिघळू नये, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत...
Ajit Pawar-milind Narvekar
Ajit Pawar-milind Narvekar

पुणे : पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादीतील पक्षांतर हे शिवसेनेला फारसे रुचलेले दिसत नाहीत. राष्ट्रावादीचे स्थानिक आमदार निलेश लंके यांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये जावू नयेत, यासाठी नाईलाज म्हणून पक्षात घेतले असले तरी आता ते परत पाठवावेत, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पाठवला असल्याची चर्चा आहे.

अजितदादा पवार यांच्या कार्यालयाशी `मातोश्री` संपर्क ठेवून आहे. महाआघाडीतील दोन्ही महत्वाच्या पक्षांत कोणताही तणाव राहू नये, यासाठी वातावरण सलोख्याचे ठेवायचे प्रयत्न सुरु आहेत. नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता होती. नगर जिल्हयात भाजपला बळ मिळू नये, यासाठी अपरिहार्यता म्हणून हे पक्षांतर झाल्याचे आमदार निलेश लंके यांनी `सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. लंके यांचा हा दावा `सरकारनामा`त प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच नार्वेकर यांनी अजितदादांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले होते लंके? 

हे नगरसेवक मागील काही दिवसांपासून आपल्याशी संपर्क करून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होते. तथापि, मी त्यांना समजावून सांगितले. तुम्ही राष्ट्रवादीत येण्यापेक्षा आम्ही ताकद देतो. तुमचा पाण्याचा प्रश्न सोडविता. तुम्ही इकडे येणे ठिक नाही. परंतु शिवसेनेत आपले पटत नाही. राष्ट्रवादीही आपल्याला पदरात घेत नाही. या सर्व परिस्थितीत आपल्याला कोणीतरी नेता असावा म्हणून ते भाजपकडे गेले. तेथे त्यांचा पक्षप्रवेशही ठरला. ते पुन्हा माझ्याकडे आले. अखेरची विनंती केली. हे सर्व अजित पवार यांना सांगितले. पवार यांनी स्पष्ट सांगितले, की शिवसेनेच्या कोणालाही राष्ट्रवादीत घ्यायचे नाही. सरकार दोन्ही पक्षाचे असताना असे करता येणार नाही. याबाबत पवार यांनी त्या पाचही जणांना बोलावून घेतले. त्यांना समजावून सांगितले. परंतु त्या नगरसेवकांनी सांगितले, की आम्हाला शिवसेनेचे नेतृत्त्व मान्य नाही. तुम्ही आम्हाला राष्ट्रवादीत घेतले नाही, तर आम्ही भाजपमध्ये जावू. हे सर्व ऐकून अखेर त्यांना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा लंके यांनी केला होता.  

वाचा- पारनेरमधील राजकीय घडामोडींचे सविस्तर वार्तांकन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com