मराठा समाजाच्या हिताचा निर्णय आता राज्य पातळीवर व्हावा  : रोहित पवार  - The interest of the Maratha community should now be decided at the state level: Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाच्या हिताचा निर्णय आता राज्य पातळीवर व्हावा  : रोहित पवार 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 मे 2021

त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण न आणता सर्वांनी योग्य असा निर्णय घ्यावा

नगर : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निर्णय दिला आहे. त्याचा मी काही जास्त अभ्यास केलेला नाही. पण जे कळतंय, त्यानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जादा आरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. शेवटी ते सर्वोच्च न्यायालय आहे. पण, हा निकाल ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाईट वाटतंय.  सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला माझी एवढीच विनंती आहे की, आता सर्वांनी एकत्रित बसून मराठा समाजातील जो युवावर्ग आहे. त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्याला राज्य पातळीवर कसा घेता येईल, याची विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार (Mla Rohit pawar) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली. (The interest of the Maratha community should now be decided at the state level : Rohit Pawar)

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज मराठा आरक्षण घटनाबाह्य म्हणून रद्द केले. त्यामुळे मराठा समजाच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे. निकाल देताना कोर्टाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी अपवादात्मक स्थिती नसल्याचे सांगत हे आरक्षण योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. तो ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाईट वाटतंय. खरं तर आरक्षण मिळालं असतं, तर मराठा समाजातील तरुणांना त्याचा फायदा झाला असता. पण, सुप्रीम कोर्टाने त्याबाबतचा निर्णय आता दिला आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा  ः मराठा आरक्षण : 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देणे म्हणजे नियमापेक्षा अपवाद मोठा होणे.....

आमदार रोहित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणप्रकरणी कोणीही राजकारण करू नये. कारण, आधीच्या सरकारने जे वकिल दिले होते, तेच वकील या सरकारनेसुद्धा कायम ठेवले आहेत. त्यांचा युक्तीवादसुद्धा योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला आहे. पण, शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. तो जर दुसऱ्या बाजूने झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करत आहोत, तर चांगली गोष्ट झाली असती. पण, त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येत नाही.

आपल्या (सरकार) हातात ज्या गोष्टी आहेत,  त्याच्याबाबत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या सर्वांनी एकत्र बसून या समाजातील युवा वर्गाला जी काही मदत आपल्याला देता येईल. त्यात नोकरी आणि शिक्षणाबाबत योग्य तो विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणी कोणीही राजकारण करू नये. कारण, हा लढा मराठा समाजातील मुला-मुलांनी आणि तेथील लोकांनी एकत्र येऊन उभारला होता. त्याच्यामागे कोणतीही राजकीय ताकद नव्हती. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण न आणता सर्वांनी योग्य असा निर्णय घ्यावा, अशी माझी एक युवक म्हणून सर्वांना विनंती आहे, असे आवाहनही त्यांनी पवार यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख