नाशिकमध्ये काँग्रेस म्हणजे गोंधळलेला पक्ष! - Congress is cofussed party in Nashik, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमध्ये काँग्रेस म्हणजे गोंधळलेला पक्ष!

डॅा राहूल रनाळकर
रविवार, 28 मार्च 2021

महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नाशिक शहरात शिवसेना शंभर प्लस जाण्याची तयारी करतेय. काँग्रेसच्या पातळीवर मात्र हालचाली शून्य आहेत.

नाशिक : महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नाशिक शहरात शिवसेना शंभर प्लस जाण्याची तयारी करतेय. भाजपने विकासाचे मुद्दे घेऊन मैदानात उतरण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.काँग्रेसच्या पातळीवर मात्र हालचाली शून्य आहेत. काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष आहे, हे नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेकडे बघितल्यावर सहज लक्षात येतं.

सर्व पक्षांचे पक्षश्रेष्ठी अहवाल मागावून त्यादृष्टीने पक्ष संघटना बळकटीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. राज ठाकरे यांचंही नेहमीप्रमाणे नाशिककडं लक्ष असेलच. राष्ट्रवादीची ताकद महापालिकेत फारशी नसली तरी स्वतः पालकमंत्री इथं असल्यानं ते निवडणुकीत जोर लावणार, यात शंका नाही. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरेल.  नाशिक काँग्रेसचे काही कार्यकर्ते नाना पटोलेंना जाऊन भेटले. त्यांना पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी साकड घातलं असलं, तरी पक्षाच्या बळकटीकरणाचं काम मुळापासून व्हायला हवं. कोणे एकेकाळी काँग्रेसचे आमदार- खासदार- मंत्री मुबलक होते. सुरवातीच्या काळात नाशिक महापालिकेत अनेक वर्ष सत्ता काँग्रेसकडे होती.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची सध्याची अवस्था एवढी बिकट झालीये, की त्यांच्याकडे जायला कोणी तयार नाही. जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी पक्षाभोवती जणू भिंत उभारून ठेवलीये. काँग्रेसमधून जाणाऱ्यांची संख्या भरपूर; मात्र काँग्रेसकडे फिरकण्यास कोणी तयार नाही. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास नाही. नाशिक शहर काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. ‘जेवढे नेते तेवढे गट’, ही स्थिती न सोडल्यास काँग्रेसला येणारी काय, पुढच्या अनेक निवडणुकांत यश मिळणे कठीण आहे. काही वर्षांपूर्वी शहराध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रचंड लॉबिंग व्हायचं. सध्या शहराध्यक्ष व्हायला काँग्रेसमध्ये कोणी तयार नाही. त्याचत्या पदाधिकाऱ्यांना पद दिली जातात, हे पक्षासाठी काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे ऊर्जितावस्थेसाठी केवळ साकडं घालून काही होणार नाही. त्यासाठी तळागाळात जाऊन काम करावं लागेल. 

शहर-जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या कित्येक वर्षांत लोकांसाठी म्हणून काहीही केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रदेश स्तरावरील अथवा देशपातळीवरील नेता आल्यानंतर त्यांची खातरदारी करण्यात अनेक वर्षे वाया गेली. साधं पक्ष सदस्य नोंदणी अभियान काँग्रेसचं कधी दिसलं नाही. लोकांपर्यंत कोणताही ठोस कार्यक्रम घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते कधी दिसले नाहीत. शून्य कार्यक्रम, ही काँग्रेसची संस्कृती झालेली आहे. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कोणी पदाधिकारी बसत नाहीत, कमिटीला अक्षरशः धूळ लागली आहे. वरिष्ठ पातळीवरील कोणतेही काँग्रेसचे नेते उत्तर महाराष्ट्रात फिरकत नाहीत. आले तरी कोणाला फार पत्ता लागत नाही. गुपचूप मीटिंग घेतल्या जातात. त्यादेखील ठराविक लोकांबरोबर. त्यापुढे काँग्रेस जायला तयार नाही. 

गमतीची बाब म्हणजे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काँग्रेस अन्य पक्षांच्या चुकांवर अवलंबून असल्याचं दिसून येतं. लोकांना आपोआप काँग्रेसची आठवण येईल आणि ‘काँग्रेस बरी होती’, असं लोक भाजपला कंटाळून म्हणतील, अशा वेळेची काँग्रेस वाट पाहत असावी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचा प्रचंड अभाव आहे आणि लोकांमध्येही पक्षाबद्दल अविश्वासाचं वातावरण आहे. खरंतर अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांना पर्यायी पक्ष नेहमीच हवा असतो. त्याचत्या पक्षांना जनता कंटाळली आहे, हे वास्तव आहे. राष्ट्रीय पक्ष असूनही काँग्रेस प्रादेशिक तर सोडा, पण जिल्हा पातळीवरील पक्ष झाल्याची स्थिती आहे. किमान जिथे काँग्रेसचे पॉकेट्स आहेत, तिथे तरी त्यांनी काम करायला हवं; पण तिथेही प्रचंड गटबाजीनं काँग्रेसला पोखरलं आहे. काँग्रेसचं मोठं आंदोलन झाल्याचं फारसं कुणाला आठवत नाही. काँग्रेसची आंदोलनं हल्ली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होतात आणि तिथेच ती विरतात. या फुसक्या आंदोलनांमुळे पक्षाला ऊर्जितावस्था लाभण्याची शक्यता धूसर आहे. नाना पटोले यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. जिल्हावार स्थापित झालेले संस्थानिक त्यांचा कितपत निभाव लागू देतील, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख