कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यात आवर्तनाचा प्रश्न मार्गी : आमदार बेनके - The question of rotation in other canals including Kukdi left canal is solved: MLA Benke | Politics Marathi News - Sarkarnama

कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यात आवर्तनाचा प्रश्न मार्गी : आमदार बेनके

रवींद्र पाटे
सोमवार, 17 मे 2021

या मुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नारायणगाव : पिंपळगाव जोगे (Pimpalgaon Joga) कालव्याच्या पाणी आवर्तनाबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अश्वस्त केल्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याच्या विरोधात जुन्नरच्या शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज मागे घेतल्याने कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यात अवर्तन सोडण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली. (The question of rotation in other canals including Kukdi left canal is solved: MLA Benke)

या मुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जलसंपदा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी डावा कालव्यात ९ मे पासून आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने उन्हाळी आवर्तने सोडणे अपेक्षित नाही. तसेच पिंपळगाव जोगे धरणातील अचल( मृत) साठ्यातून आवर्तन पूर्ण करण्यासाठी पाणी घेणे नियमबाह्य आहे आदी मुद्दे उपस्थित करून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाच्या विरोधात जुन्नरच्या शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या मुळे कुकडी डावा कालव्याचे आवर्तन स्थगित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या बाबत आज सुनावणी होती. दरम्यान आमदार बेनके यांच्या पुढाकारातून जुन्नरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील असे जलसंपदा मंत्री पाटील  यांनी  याचिकाकर्ते व शेतकऱ्यांना अश्वस्त केले. तसेच पिंपळगाव जोगे डावा कालव्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी  काळू नदीवर धरण बांधुन हे पाणी कुकडी प्रकल्पात वळवले जाईल, टंचाईच्या काळात पिंपळगाव जोगे धरणातील पाणी कालव्यात सोडण्यासाठी वीज पंप बसवणे, मीना, कुकडी व घोड नदीवरील बंधाऱ्याचा समावेश कूकडी प्रकल्पात केला जाईल. आदी बाबत जलसंपदा मंत्री पाटील यांनी आमदार बेनके यांच्याशी चर्चा केली.या मुळे जुन्नरच्या शेतकरी प्रशांत अ. औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज मागे घेतली.

येडगाव धरणातून पाणी सोडणार

येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात २८ दिवसांत सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना होणार आहे. येडगाव धरणात आज सायंकाळ पासून डिंभे धरण व पिंपळगाव जोगे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. येडगाव धरणात पुरेसा पाणी साठा झाल्या नंतर पुढील तीन दिवसांत कुकडी डावा कालव्यात पाणी आवर्तन सुरू करण्यात येईल.

- प्रशांत कडूसकर(  कार्यकारी अभियंता: कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१, नारायणगाव) :

आज अखेर कुकडी प्रकल्पाचा धरण निहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के):

येडगाव :०.७९२ (४०.७५ टक्के),माणिकडोह : ०.७९५  (७.८१ ), वडज: ०.३०३  (२५.८३ ), डिंभे :४.४८२  (३५.८७ ), पिंपळगाव जोगे: ०(०), मृतसाठा : ३.९७६ टीएमसी.

हेही वाचा...

निळवंड्याचे पाणी आणणार

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख