पुणे विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची 50 गुणांची परीक्षा

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. या नवीन परीक्षांच्या प्रस्तावास शनिवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये दीड तासात 50 गुणांची परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पुणे विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची 50 गुणांची परीक्षा
Pune University will conduct final year examination of 50 marks

पुणे : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. या नवीन परीक्षांच्या प्रस्तावास शनिवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये दीड तासात 50 गुणांची परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

कोरोनामुळे विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या असून, त्यांना अंतर्गत मूल्यांकनावर पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची मात्र परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाने यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विद्या परिषदेच्या बैठकीत या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, याचा प्रस्ताव मांडून त्यास मान्यता देण्यात आली आहे. 

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे पेपर 1 ते 15 जुलै या कालावधीत होणार आहेत. महाविद्यालय स्तरावरच याचे प्रश्नसंच काढून महाविद्यालयातच पेपर तपासले जाणार आहेत. अंतिम वर्षाची नियमित परीक्षा 16 ते 31 जुलै या दरम्यान होणार आहे. यामध्ये विद्यापीठाने पेपर काढून ते महाविद्यालयांना पाठविले जाणार आहेत. दीड तासात 50 गुणांची परीक्षा घेतली जाईल. या उत्तरपत्रिका महाविद्यालय स्तरावरच तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका लवकर तपासून निकाल वेळेत लावता येणार आहे. 

पुरवणी परीक्षेची तयारी 

पुणे विद्यापीठात महाराष्ट्राबरोबरच परप्रांतातील व परदेशातील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी घरी परत गेले आहेत, त्यामुळे जुलै महिन्यात परीक्षांसाठी येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित रहाणार नाही. तसेच, पुण्यात येऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्‍य नसेल तर त्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सोयीचे केंद्रही निवडता यावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

पूर्वीच्या आदेशानुसार नियोजन

कोरोनामुळे राज्यातील 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून त्यांना ग्रेड पद्धतीने उत्तीर्ण करावे, यासाठी "यूजीसी'कडे पत्र पाठवले आहे. अद्याप परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूर्वीच्या आदेशानुसार नियोजन करण्यात आले आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि सोशल डिस्टन्स ठेऊन परीक्षा घेता याव्यात, याचे नियोजन करण्यात आले आहे. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in