पुणे विद्यापीठाचा अजब कारभार ; कोल्हापुरातून परीक्षा संचालकांना आणता येईना म्हणून संचालकच बदलले - As the examination director could not be brought from Kolhapur, Pune University changed the director | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे विद्यापीठाचा अजब कारभार ; कोल्हापुरातून परीक्षा संचालकांना आणता येईना म्हणून संचालकच बदलले

उमेश घोंगडे
शनिवार, 16 मे 2020

 पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकपदी डॉ. काकडे यांची दोन-तीन महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती.

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुढे परीक्षांच्या नियोजनाचे आव्हान असताना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे कोल्हापूरमध्ये अडकून पडले आहेत. तातडीची उपाययोजना म्हणून विद्यापीठाने त्यांच्या पदाचा कार्यभार डॉ. अरविंद शालिग्राम यांच्याकडे सोपविला आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्‍न असूनही परीक्षा संचालक डॉ. काकडे कोल्हापूरहून का येत नाहीत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पुण्याला आणण्यासाठी विद्यापीठाकडे मोटार उपलब्ध नसल्याचे समजले.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकपदी डॉ. काकडे यांची दोन-तीन महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. काकडे यांनी यापूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात परीक्षा संचालक पदावर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी आता पुणे विद्यापीठाची जबाबदारी स्विकारली. मात्र, लॉकडाऊनमुळे ते कोल्हापूरला अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

१२ एप्रिलपर्यंत ते विद्यापीठात रूजू होणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मोटारीला कोल्हापूरच्या परतीचा पास न दिल्याने त्यांना कोल्हापूरमधून मोटार आणता येईना. दुसरीकडे त्यांना आणण्यासाठी विद्यापीठाकडे मोटार वाहन उपलब्ध नसल्याचे समजले.

डॉ. शालिग्राम यांचीच नेमणूक का ?

डॉ. अरविंद शालिग्राम हे विद्यापीठात इलक्टॉनिक्स विभागाचे प्रमुख होते. नुकतेच ते विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी विद्यापीठाच्या विविध पदावर यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे परीक्षा संचालकपदाचा कार्यभार देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विद्यापीठात पद कोणतेही असो, प्रत्येक ठिकाणी डॉ. शालिग्राम यांचीच नेमणूक का करण्यात येते. दुसरे सक्षम आधिकारी विद्यापीठात नाहीत का ? असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे. डॉ. काकडे यांना टाळून परीक्षा घेण्याबाबत नेमके कोणते नियोजन करण्यात येत आहे. ? ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट घालण्यात येत आहे का ? असे प्रश्‍न विचारण्यात येऊ लागले आहे. या बाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख