तपासातील अक्षम्य चुकांमुळे बदली नाहीः परमबीरसिंह
Parmbirsing.jpg

तपासातील अक्षम्य चुकांमुळे बदली नाहीः परमबीरसिंह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या स्फोटक पत्रात परमबीरसिंह यांनी आपल्या बदलीमागील कारण सांगितले आहे.

पिंपरीः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अॅंटिलिया निवासस्थानापासून एक किलोमीटरवर सापडलेल्या स्फोटक मोटारीच्या तपासात मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह व त्यांच्या कार्यालयाने अक्षम्य हलगर्जीपणा केला म्हणून त्यांची बदली केल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा परमबीरसिंह यांनी काल ठामपणे फेटाळला. प्रशासकीय निकड म्हणून आपली बदली केल्याचे गृहविभागाच्या आदेशात म्हटले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या स्फोटक पत्रात परमबीरसिंह यांनी आपल्या बदलीमागील कारण सांगितले आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम २२ एन (२) अन्वये प्रशासकीय निकड दाखवून राज्य सरकारने आपली बदली केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे अॅंटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटकाच्या तपासात अक्षम्य अशा गंभीर चुका केल्याने परमबीरसिंह यांची बदली केल्याचे म्हणणारे गृहमंत्री देशमुख खोटे पडले आहेत. आपल्याविरुद्ध कसलाही पुरावा नाही, तरी मला बळीचा बकरा बनवले आहे,असे परमबीरसिंह यांचे म्हणणे आहे. गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची कहानी सांगितल्याचे विपरित परिणाम काय होतील, याची कल्पना असून ते भोगण्यास तयार असल्याचेही त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

गेले वर्षभर माझ्या आय़ुक्तपदाच्या कारकिर्दीत देशमुखांचा पोलिस कामात व त्यातही तपासात वांरवार मोठा हस्तक्षेप होत होता. ते माझ्या अपरोक्ष कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून तपास विशिष्ट पद्धतीनेच कसा करायचा, पैसे कसे गोळा करायचे हे सांगत होते, असा खळबळजनक आऱोपही परमबीरसिंह यांनी केला आहे. पोलिस तपासातील हा राजकीय हस्तक्षेप बेकायदेशीर आणि असंविधानिकही असल्याचे सांगत त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही कडक ताशेरे ओढलेले आहेत,याकडे त्यांनी मुख्यंमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. मी माझ्या मुंबई पोलिस दलाची पूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण, तपास असाच झाला पाहिजे असा राजकीय हस्तक्षेप करणारे दुसरेच आहेत,असे सांगत त्यांनी त्याचे खापर देशमुखांवरच फोडले आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in