आमदार नीलेश लंके यांना जे जमते; ते मातब्बर लोकप्रतिनिधींना का जमू नये 

एकही स्वखर्चाचे कोविड सेंटर उभे राहिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आमदार नीलेश लंके यांना जे जमते; ते मातब्बर लोकप्रतिनिधींना का जमू नये 
MLA Nilesh Lanke can do; Why shouldn't the people's representatives in Pimpri Chinchwad do that?

पिंपरी  ः एका सामान्य कुटुंबातील नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अकराशे बेडचे कोविड सेंटर उभे केले. श्रीगोंदा तालुक्यात अनुराधा नागवडे  ह्या अडीचशे बेडचे कोविड सेंटर सुरू करतात. मग लंके यांच्यापेक्षा कितीतरी मोठी क्षमता असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना ते का शक्य होत नाही, असा रोकडा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी विचारला आहे. अनेक बिल्डर नगरसेवक असलेल्या श्रीमंत पिंपरी महापलिकेच्या हद्दीत असे एकही स्वखर्चाचे कोविड सेंटर उभे राहिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. दररोज तीन हजारावर नवे रुग्ण सापडत असून पन्नासऐक बळी जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका व खासगी रुग्णालये फुल झाली आहेत. प्रशासन व त्यांची तोकडी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे मदत मागत आहेत. मात्र ते फक्त पत्रकबाजीतून मागण्या करताना दिसत आहेत, असे भापकर म्हणाले. 

ही वेळ कागदी घोडे नाचवण्याची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे, असे त्यांनी सुनावले. यासंदर्भात ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकप्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या पाचशे, हजार फ्लॅटच्या स्कीम शहरात सुरू आहेत. तर, काहींची मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. या स्कीम आणि मंगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड सेंटर सुरू करू इच्छितो, त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, असा पुढाकार घेताना मात्र कोणीही दिसत नाही, हे खेदजनक आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचे मतदार सध्या रामभरोसे आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

बेडच शिल्लक नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मंगल कार्यालये व हॉटेल्स महापालिकेने ताब्यात घेवून तेथे कोरोना सेंटर सुरु करण्याचा विचार करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. तसेच, शहरातील १८ मीटरपेक्षा कमी रुंद गल्लीबोळातील सिमेट रस्त्यांची कामे थांबवून तो निधी व्हेंटीलेटर, आयसीयू, सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर उभारणीकरिता वापरण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in