सॅनिटायझर पिल्याने सहा तरुणांचा मृत्यू, वणीतील घटना - Six youths die after drinking sanitizer, incident in Wani | Politics Marathi News - Sarkarnama

सॅनिटायझर पिल्याने सहा तरुणांचा मृत्यू, वणीतील घटना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

दोन दिवसांपूर्वी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांतच एकूण सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे वणी शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

वणी (जि. यवतमाळ) : वणी शहरात व्यसनी व्यक्तींनी चक्क सॅनिटायझर पिऊन तलफ भागविली. त्यात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २४) उघडकीस आली.

दोन दिवसांपूर्वी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांतच एकूण सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे वणी शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

दत्ता कवडू लांजेवार (वय ४७, रा. तेली फैल), नूतन देवराव पाटणकर (वय ३५, रा. ग्रामीण रुग्णालयाजवळ), संतोष मेहर (३५, रा. एकतानगर), प्रशांत रुईकर (वय ३८, रा. जटाशंकर चौक) अशी मृतांची नावे आहेत.

गेल्या दोन दिवसांत मृत्यू झालेल्या तरुणांपैकी केवळ दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी याबाबत नोंद केली आहे. परंतु, अन्य मृतांच्या नातेवाइकांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीसोबतच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दारूची दुकाने बंद आहेत. लपूनछपून चढ्यादराने दारू विकली जात आहे. त्यामुळे दारू पिणे परवडणारे नसल्याने व्यसनी तरुण सॅनिटायझरचा वापर नशेकरिता करीत असल्याचे वास्तव समोर आले. वणी शहरात विविध भागांतील व्यसनी तरुणांनी शुक्रवारी (ता. २३) सॅनिटायझर पिले. काही वेळाने त्यांना मळमळ व उलट्या व्हायला लागल्या. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

वणीमधील सलग दुसरी घटना

गेल्या दोन दिवसांत सॅनिटायझर पिल्याची ही वणीतील दुसरी घटना आहे. शुक्रवारी (ता. २३) गणेश उत्तम शेलार (वय ४३, रा. जैताईनगर, वणी) व सुनील महादेव ढेंगळे (वय ३६, रा. देशमुखवाडी, वणी) यांचा मृत्यू झाला होता; तर सॅनिटायझर पिल्याने शनिवारी तब्बल चार तरुणांना आपला जीव गमवावा लागला. शहरातील अल्कोहोलिक व्यक्ती जिवाची पर्वा न करता सॅनिटायझर पीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षकांची भेट

दरम्यान, या घटनेची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव दरणे यांनी मृतांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी तरुणांनी सॅनिटायर पिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. भालचंद्र आवारे यांची उपस्थिती होती.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख