कुणीतरी चूक करतो आणि त्याचा ठपका आमच्यासकट सर्वांवर येतो : शरद पवार  - Someone makes a mistake and the blame falls on us all : Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

कुणीतरी चूक करतो आणि त्याचा ठपका आमच्यासकट सर्वांवर येतो : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

आमदारांचे नाव नसल्याने त्यांचे महत्व कमी होत नाही.

अकोले : "शेंडी येथील कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहिली मला, त्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांचेच नाव दिसलं नाही. हे बरं नाही. लहानसहान गोष्टी असतात. आमदारांचे नाव नसल्याने त्यांचे महत्व कमी होत नाही, ते लोकांमध्येच राहतात, कुणीतरी एखादी चूक करतो आणि त्याचा ठपका आमच्यासकट सर्वांच्यावर येतो,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कान टोचले. 

शेंडी (ता. अकोले) येथे यशवंतराव भांगरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, "अशोकराव, माझी आग्रहाची विनंती आहे. तुम्ही सर्वजण विकासाच्या कामाची बांधिलकी ठेवून काम करणारे आहात. तुम्ही डॉ. लहामटे यांच्या निवडणुकीत मोलाची कामगिरी बजावली आहे, याची प्रचिती मला स्वतःला आहे. त्यामुळे तुम्ही जे यश मिळवलं. त्या यशाची पताका आपल्याला कायम टिकवायची आहे.'' 

"मधुकर पिचड यांना मंत्री केले. सरकार गेल्यानंतर विरोधी पक्षाचा नेता केले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर राज्याचे अध्यक्ष केले. या सर्व गोष्टी त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत केल्या. तरीही ते मला सोडून गेले आणि पराभूत झाले. अकोले येथील सभेतच लोकांच्या मनात काय चालले, ते मला समजले होते,'' असेही पवार यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "मध्यंतरी वर्ष-दीड वर्षापूर्वी आमच्या सहकाऱ्यांच्या अंगात आलं. अंगात आलेली मंडळी चमत्कारिक वागायला लागली. रोज एक यादी बघायला मिळायची. आज हा गेला, तो गेला. पण मला आठवतंय 1980 मध्ये निवडणूक झाली आणि माझ्या बरोबर काम करणारे 56 आमदार निवडून आले होते. मी 56 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. काही कामानिमित्त मी इंग्लडला गेलो, तर इकडे 50 आमदार फुटले. सोबत फक्त 6 आमदार राहिले. मात्र, मी स्थिर होतो. पुढील निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी 48 आमदार पराभूत झाले. पण सर्वसामान्यांना हे आवडत नाही.'' 

पारंपरिक वाद्य व कोंबड नृत्य करत औक्षण करत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र, अचानक कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर पक्षांतर झाले व आज भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख