आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी शहर शिवसेनेची चाचपणी - Shivsena Started Prepartions in Sangamner for Forthcoming Elections | Politics Marathi News - Sarkarnama

आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी शहर शिवसेनेची चाचपणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

राज्याप्रमाणे आगामी स्थानिक पातळीवरील निवडणुकांत एकत्र काम केल्यास, सुड आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून शाश्वत विकासाचे राजकारण करणे शक्य होईल असे मत शिवसेना संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केले. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

संगमनेर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारची राज्यात यशस्वी घोडदौड सुरु आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोलाची साथ शिवसेनेला दिली आहे. राज्याप्रमाणे आगामी स्थानिक पातळीवरील निवडणुकांत एकत्र काम केल्यास, सुड आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून शाश्वत विकासाचे राजकारण करणे शक्य होईल असे मत शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केले. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवीत महसूलमंत्री थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये सहभाग घेतला, त्याचप्रमाणे संगमनेरच्या शिवसैनिकांची मंत्री थोरात व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निवडणूक लढवण्यात कोणतीच हरकत नाही. शिवसेना हा पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार चालणारा पक्ष आहे, राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार असेच टिकून त्यातून राज्याचे हित होणार असेल तर, स्थानिक निवडणुकीत देखील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व नगराध्यक्षा दुर्गा तांबे शिवसेनेला विश्वासात घेऊन काम करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि वरिष्ठ लवकरच याबाबत निर्णय देतील त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना कतारी यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांना दिल्या.

संगमनेरात कोविडच्या काळात मोठे सेवाकार्य उभे राहिले, शिवभोजन योजनेच्या माध्यमातून दररोज शेकडो गोरगरीबांच्या जेवणाची सोय झाली. आरोग्य योजनांच्या माध्यमातून शिवसेनेची वैद्यकीय सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये शिवसेनेविषयी विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. या जोरावर आगामी निवडणूकीसाठी शिवसेनेने तयारीला सुरवात केली आहे. यावेळी उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, लखन घोरपडे, रमेश काळे, विकास डमाळे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, प्रथमेश बेल्हेकर, अमोल डुकरे, दीपक साळुंके, बाळू घोडके, दीपक वनम, संगीता गायकवाड, सुरेखा गुंजाळ, रेणुका शिंदे, संभव लोढा, ब्रम्हा खिडके, वैभव अभंग, फैसल सय्यद प्रतीक मिसाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख