अकोले : ''आपली ही शेवटची निवडणूक असून चांगले करता आले नसेल मात्र आपण वाईट कुणाचेही केले नाही. मला सत्तेवर अजित पवार, मधुकर पिचड यांच्यामुळे संधी मिळाली. मी शरद पवारांच्या नावावर चाळीस वर्षे राजकारण केले, त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार हेच माझ्या बिनविरोधचे शिल्पकार आहेत. मी त्यांचे पुण्यात जाऊन आभार मानले. त्यांच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही,'' असे भावनिक उद्गार नगर जिल्हा बॅंकेचे बिनविरोध निवडलेले संचालक सीताराम गायकर यांनी काढले.
अकोले येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात गायकर बोलत होते. या वेळी महविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे सीताराम गायकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. अगस्ती कारखान्याच्या आगामी निवडणुकीत त्यांनी पवार कुटुंबीयांची मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कार्यक्रमात गायकर यांनी केवळ एकदाच माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव घेतले. मात्र, माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव घेतले नाही. मात्र, अगस्ती कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जाईल. कर्जाची चिंता करू नका, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांचे सतत नाव घेऊन त्यांनी पिचड यांचे नाव घेण्यास टाळले. त्यामुळे अजित पवार व गायकर यांची मॅच फिक्सिंग झाल्याची चर्चा तालुक्यात नव्हे, तर जिल्ह्यात, राज्यात होत असून कोणत्याही क्षणी ते राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोले तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे व महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. गायकर यांनी केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक केले असेल तरी पवार कुटुंबीयांचे सतत नाव घेत त्यांचेही कौतुक केले, त्यामुळे त्यांना जिल्हा बॅंकेत पद, जिल्हा बॅंकेचा घोटाळा चौकशी थांबविणे किंवा अगस्ती कारखान्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याबाबत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मात्र "वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचे समजते.

