राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल  - Minister of State Prajakta Tanpure got angry seeing the stench in MSEDCL office | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

मंत्र्यांनी वरिष्ठांना फोनवरून चांगलेच झापले. 

श्रीगोंदे (जि. नगर) : उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शनिवारी (ता. 30 जानेवारी) श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, महावितरणचे अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यातच शेतकऱ्यांनी तनपुरे यांच्याकडे महावितरणच्या गंभीर तक्रारी केल्यावर त्याचे निराकरण करण्यासाठी अधिकारीच नसल्याने मंत्र्यांनी थेट महावितरणचे शहरातील कार्यालय गाठले. मंत्री येणार हा निरोपही गेला होता. मात्र, कार्यालयाला टाळे होते. मंत्री आल्यावर घाईने कार्यालय उघडले. मात्र, आतील दुर्गंधी आणि अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने मंत्र्यांनी वरिष्ठांना फोनवरून चांगलेच झापले. 

श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांनी घनशाम शेलार यांच्या माध्यमातून आज मंत्री तनपुरे यांच्याकडे महावितरणच्या तक्रारींचा पाढाच वाचला. यात मढेवडगाव, वडघुल येथील शेतकरी आघाडीवर होते. वीजबिले भरली, मात्र वीज सुरु होत नाही. थेट उपकेंद्रातूनच वीज बंद केली जाते. वीज बिले भरण्यासाठी तयारी आहे. मात्र, बिलेच मिळत नाहीत. अधिकारी आणि कर्मचारी जागेवर सापडत नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारी मांडल्यानंतर मंत्री तनपुरे यांनी अधिकारी कोण आले आहेत? असे विचारताच कुणीही उपस्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र संयम दाखवित मंत्री तनपुरे यांनी, "अधिकाऱ्यांना खूप कामे असतात, आपणच त्यांच्या कार्यालयात जावू' असे म्हणत शहरातील कार्यालय गाठले. 

त्यापूर्वी मंत्री येत आहेत, असा निरोप संबंधित अधिकाऱ्यांना दिला गेला होता. मात्र तनपुरे कार्यालयात पोचले, पण कार्यालय बंदच होते. आज सुटी असल्याचे सांगण्यात आले. तरीही मंत्री शांतच होते. घाईने एका अधिकाऱ्याने कार्यालय उघडले आणि मंत्र्यांना आत एका खोलीत नेले. मात्र, तेथील दुर्गंधी आणि त्या कार्यालयाची अवस्था पाहून मंत्री चिडले. त्यातच टी शर्ट घातलेला एक अधिकारी मंत्र्यांच्या समोरच्या खुर्चात जावून बसले. त्यावर मंत्र्यांनी त्यांना चांगलेच झापले. 

शेतकरी उभे आणि तुम्ही माझ्यासमोर बसता, प्रोटाकॉल समजतो की नाही? असे सुनावताच अधिकारी ताडकन उठले. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण त्याही अधिकाऱ्यांना करता येत नव्हते. मग समजले की उपअभियंता तेथे नाहीत. त्यांना फोन लावल्यावर ते आजारी पडल्याचे सांगितले गेले. 

या सगळ्या गोंधळात मंत्री तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी येत्या शुक्रवारी आढावा बैठक घेण्याची मागणी घनश्‍याम शेलार यांनी केली व ती मान्य करीत तनपुरे यांनी महावितरणच्या वरिष्ठांना पुन्हा फैलावर घेत मला सगळे रिपोर्टिंग करा, असा आदेश दिला. 

या वेळी शेलार, ऋषिकेश गायकवाड, भाऊ मांडे, फुलसिंग मांडे, दीपक गायकवाड, दीपक गाडे, अमोल गाढवे, राम घोडके, टकले उपस्थित होते. 

नवी योजना शेतकऱ्यांना सांगा 

राज्यमंत्री तनपुरे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून, शेतीपंपाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ द्या. त्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे, ती लोकांना सांगण्यासाठी अगोदर वाड्या-वस्त्यांवर जा. शेतकऱ्यांच्याही अडचणी समजून घ्या; तोपर्यंत कुठलेही वीज कनेक्‍शन तोडू नका, असे बजावले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख