देशात नऊ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त ऑक्‍सिजनवर - More than nine lakh corona oxygenated in the country | Politics Marathi News - Sarkarnama

देशात नऊ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त ऑक्‍सिजनवर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो आहे, असा केंद्राचा दावा आहे. मात्र अजूनही देशभरात नऊ लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त केवळ ऑक्‍सिजनच्या आधारावरच जगत आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत ही कबुली दिली.

नवी दिल्ली : देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो आहे, असा केंद्राचा दावा आहे. मात्र अजूनही देशभरात नऊ लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त केवळ ऑक्‍सिजनच्या आधारावरच जगत आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhan) यांनी एका बैठकीत ही कबुली दिली. (More than nine lakh corona oxygenated in the country)

कोरोना निर्मूलन मोहिमेंतर्गत मंत्रिगटाच्या बैठकीत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले, की देशभरात 9 लाख 2 हजार 291 रुग्ण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. विदेश मंत्री एस. जयशंकर, नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कोरोना निर्मूलनाबाबत प्रत्येक मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराची चर्चा करण्यात आली.

डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 1 लाख 70 हजार 842 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण रुग्ण संख्येच्या 1.34 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात आणि 3.70 टक्के रुग्णांवर ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू आहेत. कोरोनापासून संपूर्ण बचावासाठी तिचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे आणि याबाबत केंद्र जगत जनजागृती मोहीम राबवत आहे, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.

रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेसची विक्रमी धाव

कोरोना काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उद्भवलेल्या ऑक्सिजन टंचाईवर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसची धाव वाढत आहे.
शनिवारी (८ मे ) अशा एक्सप्रेसमधून ४१ टँकरद्वारे ७१८ मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक झाली.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन एक्सप्रेसमधून झालेला दैनंदिन वाहतुकीचा हा विक्रम असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दिल्ली व उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राला या माध्यमातून आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २९३ मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा..

कृषी धोरणाबाबत नवीन समिती

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई, ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने पंतप्रधान कार्यालयाने ऑक्सिजन एक्सप्रेसची संकल्पना प्रत्यक्षात आणली. कानपूर येथे पहिली ऑक्सिजन ट्रेन पोहोचली. त्यानंतर दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ, पाटणा आदी भागांमध्ये या गाड्या पाठवण्यात आल्या.

रविवारपर्यंत महाराष्ट्रासह २६८ टँकरद्वारे ४२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. एकूण ६८ ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे वाहतूक झाली आहे. शनिवारी विक्रमी ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या गाडीतील सर्वाधिक म्हणजे २२२ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्तर प्रदेशला, १८० मेट्रिक टन हरियानाला पोचवण्यात आला.

राज्यनिहाय ऑक्सिजन

दिल्ली १६७९
उत्तर प्रदेश १२३०
महाराष्ट्र २९३
मध्य प्रदेश २७१
हरियाना ५५५
तेलंगण १२३
राजस्थान ४०
(आकडे मेट्रिक टनमध्ये)

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख