मोदी सरकारला काॅंग्रेसचे तिखट सवाल : भाजपकडून अहंकाराचे प्रदर्शन - congress asks attacking questions to Modi Govt on corona handling issue | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारला काॅंग्रेसचे तिखट सवाल : भाजपकडून अहंकाराचे प्रदर्शन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

डोळे, कान आणि तोंड बंद करून बसलेले मोदी सरकार अहंकारात आकंठ बुडाले आहे. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यापलीकडे सरकारला काहीही दिसले नाही.

नवी दिल्ली : जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने राजधर्म पाळताना कॉंग्रेसने (Congress) सरकारला महत्त्वाच्या सूचना देऊनही सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा सोनिया गांधींना (Soniya Gandhi) पत्र लिहून आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करत आहेत, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसने दिले आहे. कोरोना संकट नैसर्गिक नव्हे तर मोदी सरकारने स्वतःहून ओढवून घेतले असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे म्हणत असून भारतच आता जगाच्या संकटाचे कारण बनला असल्याचा प्रत्यारोपही कॉंग्रेसने केला आहे. (congress asks attacking questions to Modi Govt on corona handling issue)

पक्ष सरचिटणीस अजय माकन यांनी नड्डांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की गंगा नदीमध्ये १५० मृतदेह आढळणे, हे हृदयविदारक दृष्य असून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अहंकारी मोदी सरकार, भाजपशासित सरकारांना पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, कार्यकारिणीने सरकारला अभ्यासपूर्ण सूचना केल्या त्याही तज्ज्ञांशी चर्चा करून. पण डोळे, कान आणि तोंड बंद करून बसलेले मोदी सरकार अहंकारात आकंठ बुडाले आहे. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यापलीकडे सरकारला काहीही दिसले नाही.

हेही वाचा...

राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग

पंतप्रधान मोदींनी २८ जानेवारीला जाहीर करून टाकले की, भारताने संकटातून जगाला वाचवले पण आता चार महिन्यातच रुग्णांची संख्या प्रचंड झाल्याने जगाने भारताला लॉकडाउन केले आहे. आता तर भारतच जगाच्या संकटाचे कारण बनला आहे. तीन लाखाहून अधिक डॉक्टरची प्रतिनिधित्व करणारी आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) संस्था ही देशात चांगले काम होत नसल्यामुळे आरोग्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी करते, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेन्ट, जगप्रसिद्ध नियतकालिक नेचर, ही आपत्ती नैसर्गिक नाही तर स्वतःहून ओढवलेले संकट आहे, असे म्हणत आहे. सरकार मृतांचे आकडे दडवत आहे, हे त्यांचेही सवाल आहेत. ही नियतकालिके, आयएमए देखील राजकारण करत आहेत काय, असा सवाल माकन यांनी नड्डा यांना उद्देशून केला.

लसीकरण धोरणावर टीका

देशात १८ वरील ९० कोटी लोकसंख्या असून लसीकरणासाठी एवढ्या लोकसंख्येला १८० कोटी डोस लागतील. आतापर्यंत फक्त १७.१७ कोटी डोसच देण्यात आले असल्याने तब्बल १६२.८३ कोटी डोसची गरज आहे. मागील २४ तासातील लसीकरणाचे प्रमाण पाहिल्यास फक्त १२.१८ लाख लस देण्यात आल्या आहेत. या हिशेबाने १६२ कोटी डोस देण्यासाठी आणखी तीन वर्षे आठ महिने लागतील. ही सरकारची, नड्डांची लसीकरणाची तयारी आहे, अशा शब्दांत माकन यांनी केंद्राच्या लसीकरण धोरणाची खिल्ली उडवली.

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख