अण्णा हजारेंना समजविण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न - BJP Leaders trying to Calm Down Anna Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा हजारेंना समजविण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 जानेवारी 2021

मी जानेवारी महिण्याच्या अखेरीस दिल्ली येथे पुन्हा माझ्या जीवनातील शेवटचे उपोषण करत आहे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पाठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतली

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता राज्यातले भाजप नेते जागे झाले असून अण्णा हजारे यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. याचसाठी काल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली.

प्रत्येकाला आपल्या श्रमाचे दाम मिळावे व कोणाचेही शोषण होऊ नये, ही लोक कल्याणकारी सरकारची जबाबदारी असते. आपल्या देशात जो जनतेचे पोषण करतो, त्याच शेतकऱ्यांचे शोषण केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, या साठी मी दिल्ली येथे सात दिवस उपोषण केले होते. त्या वेळी आपल्या कार्यालयाने लेखी आश्वासन दिले ते आपण पाळले नाही. म्हणून मी जानेवारी महिण्याच्या अखेरीस दिल्ली येथे पुन्हा माझ्या जीवनातील शेवटचे उपोषण करत आहे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पाठविले आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, ''दिल्ली येथे रामलिला मैदानावर २०१८ साली मी सात दिवसांचे उपोषण केले, त्यावेळी केंद्रीय  कृषी मंत्री गजेंद्र शेखावत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडण्यासाठी पाठविले होते. त्यात उल्लेख केला होता, की सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थिक बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे. असे लखी पत्र दिले होते ते पत्र सुद्दा मी आपणास माहितीस्तव पाठवत आहे.  आपल्या सरकारने स्वामीनाथन आयोगाचा स्विकार केला आहे, तर त्याचे पालन होणे सुद्धा गरजेचे आहे. कृषी मूल्य आयोग शेतक-यांचा उत्पादनाचा सर्व खर्च गृहीत धरूण शेतीमालाच्या किंमतीची शिफारस केंद्र सरकारला करते, मात्र केंद्र सरकार त्यात ५० ते ५५ टक्के कपात करते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच दीडपट बाजारभाव देण्याऐवजी केंद्र सरकार ५० टक्के किंमती कमी करते हे दुर्देव आहे,''

दरम्यान, विखे यांनी हजारे यांची याच मुद्द्यांवर भेट घेतली. हजारे यांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित शेतक-यांच्या प्रश्नांबाबत  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशः  लक्ष घातले असून या प्रश्नी सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील असून ते केंद्र सरकारच्या सतत संपर्कात असल्याची माहिती भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांना दिली. सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही हजारे यांचे बोलणे करून दिले. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले,  ''अण्णांनी उपस्थित केलेले स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे यासह अन्य काही यांनी मांडलेले शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते फक्त केंद्राशी संबंधित नसून त्याचा राज्याशीही संबंध आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस केंद्राशी संपर्कात राहून सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील आहेत.''
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख