कालपर्यंत आत्मनिर्भर होतो; एका रात्रीत परावलंबी कसे? मनीष तिवारी यांची टीका - Becomes self-sufficient until yesterday; How about a nightmare? Criticism of Manish Tiwari | Politics Marathi News - Sarkarnama

कालपर्यंत आत्मनिर्भर होतो; एका रात्रीत परावलंबी कसे? मनीष तिवारी यांची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

भारताला ४० हून अधिक देशांकडून कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपकरणांसहीत ऑक्सिजन संयत्र, इंजेक्शन, लस मिळत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी जगभरातून मदत स्वीकारण्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारच्या आत्मनिर्भर धोरणाला लक्ष्य केले आहे. कालपर्यंत आपण आत्मनिर्भर होतो आणि एका रात्रीत आपण परदेशी मदतीवर विसंबलो, असा टोला कॉंग्रेस नेते व माजी मंत्री मनीष तिवारी यांनी आज केंद्र सरकारला लगावला.

भारताला ४० हून अधिक देशांकडून कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपकरणांसहीत ऑक्सिजन संयत्र, इंजेक्शन, लस मिळत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी याबाबत दिलेल्या माहितीनंतर मनीष तिवारी यांनी एक व्हिडिओ ट्विट करून सरकारवर हल्ला चढवला. २००४ मध्ये सुनामीसारखी भयंकर आपत्ती आली असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी परदेशी मदत नाकारली होती. सुनामीत मोठे नुकसान झाले होते. अनेक देशांनी मदत देऊ केला होता. तेव्हा डॉ. सिंग यांनी भारत आत्मनिर्भर असल्याचे म्हटले होते आणि आपत्तीकाळात आपल्या नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी भारत सक्षम असल्याचे स्पष्ट केले होते.

 

२०१४ पर्यंत भारताने कधीही इतर देशांकडून मदत घेतली नाही. मागील वर्षभरापासून भारत आत्मनिर्भर असल्याचा उपदेश केला जातो आहे. परंतु २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ दिल्यानंतर मोदी सरकारला परदेशी मदतीसाठी आवाहन करावे लागले. कालपर्यंत आपण आत्मनिर्भर असताना एका रात्रीत असे परावलंबी का झालो.
- मनीष तिवारी, कॉंग्रेस नेते.

 

हेही वाचा..

लसीकरणाच्या वितरणबाबत फुलसौदर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन 

नगर : मनपाच्या आरोग्यविभागाच्यावतीने शहरातील विविध आरोग्य केंद्रावर मोफत लस देण्यात येत आहे. त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

कोणत्या दिवशी कोणती लस द्यावयाची कॅव्हॅक्सिन - कोविशील्ड याबाबत कोठेही सूचना फलक नाहीत. अनेक जेष्ठ नागरिक लस घेण्यासाठी सकाळपासून त्या आरोग्य केंद्रावर रांगा लावत आहेत. त्याचा नंबर जवळ आल्यावर त्यांना सांगण्यात येते, की  आज लस शिल्लक नाही. त्यामुळे नाहक मनस्ताप व येथील कर्मचारी बाबत  तक्रारी होतात.  तरी संबंधिताना खालील सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी केली आहे. 
१) सर्व केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी मंडप व्यवस्था करण्यात यावी 
२) रोजच्या रोज किती लसीची वितरण होणार, याची माहिती सूचना फलकावर लावावी 
३) कोणत्या दिवशी १ ला डोस व २ रा डोस देणार, याची माहिती द्यावी 
४) सर्व मतदान केंद्रावर सामाजिक संस्थाच्या मदतीने लसीकरण केंद्र सुरु करावीत 
५) जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात यावी 

या बाबत सर्व माहिती रोजच्या रोज सूचना फलकावर देण्यात यावी, यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही व सर्व नागरिकांना लस मिळेल, असे भगवान  फुलसौदर  यांनी म्हटले आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख