खासदार डॉ. विखेंविरोधात कारवाईस खंडपीठाची मुभा - MP Dr. Permission of the bench to take action against Vikhen | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

खासदार डॉ. विखेंविरोधात कारवाईस खंडपीठाची मुभा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

रेमडेसिव्हिर वापराआधीचे भेसळयुक्त, भेसळमुक्त असे प्रमाणपत्र घेतलेले नाही, इतका साठा कुठे कसा वापरला, याचा हिशोब नसल्याने डॉ. विखे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.

औरंगाबाद : रेमडेसिव्हिर या इंजेक्‍शनचा साठा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरला बेकायदा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांनी खासदाराविरोधात कारवाई करण्याची मुभा नगर पोलिसांना असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ही याचिका 29 एप्रिल रोजी सुनावणीस ठेवली आहे. 

नगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विनापरवाना दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन्स या औषधाचा (ड्रग्ज) साठा विशेष विमानाने नगरला आणला. रेमडेसिव्हिर वापराआधीचे भेसळयुक्त, भेसळमुक्त असे प्रमाणपत्र घेतलेले नाही, इतका साठा कुठे कसा वापरला, याचा हिशोब नसल्याने डॉ. विखे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. ही कारवाई झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत फौजदारी कारवाईची विनंती करण्यात आली होती. याबाबत न्यायमूर्तींनी खासदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीने असे कृत्य केले असते, तर जशी कारवाई केली असती, त्याप्रकारची कारवाई डॉ. विखेंविरोधात करण्यास नगर पोलिसांना मुभा असल्याचे स्पष्ट करत याचिका 29 एप्रिल रोजी सुनावणीस ठेवली आहे. 

या प्रकरणात अरुण कडू, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत नगर जिल्ह्यात दहा हजार रेमडिसिव्हिर इंजेक्‍शन्स विशेष विमानाने आणून तीन रुग्णालयांना वाटप केली होती. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडीयावरही चित्रफितीद्वारे सांगितले होते.

यावर आक्षेप घेत याचिकाकर्त्यांनी डॉ. विखे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी नगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. अजिंक्‍य काळे, ऍड. राजेश मेवारा यांनी सहकार्य केले. शासनातर्फे डी. आर. काळे काम पाहत आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख