मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनची कबरच विकली ! 

परवेज इस्माईल सरकारे (54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ज्यावेळी हा अपहार झाला, त्यावेळी सरकारे कब्रस्तानचा विश्‍वस्त होता.
Yakub Memon's grave sold in Mumbai bomb blast case sold
Yakub Memon's grave sold in Mumbai bomb blast case sold

मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी फाशी देण्यात आलेला याकुब अब्दुल्ल रज्जाक मेमन याची कबर विकल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कबर मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये होती.

 परवेज इस्माईल सरकारे (54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ज्यावेळी हा अपहार झाला, त्यावेळी सरकारे कब्रस्तानचा विश्‍वस्त होता. आरोपीने याकुब मेमन व मेमन कुटुंबीयांशी संबंधित आणखी तीन कबरींची जागा मर्चंट आडनावाच्या एका कुटुंबाला दिली. त्या बदल्यात तीन लाख रुपये घेतले. त्याची कोणतीही पावती देण्यात आली नव्हती. याप्रकरणी आणखी एक आरोपी असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

गैरव्यवहारप्रकरणी याकुबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने मार्च महिन्यात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, मेमन कुटुंबीयांच्या मरिन लाईन्स येथील बडा दफनभूमीत सात कबरी आहेत, पण यातील याकुब मेमनसह कुटुंबातील तीन व्यक्तींच्या कबरी पाच लाख रुपयांना विकण्यात आल्या होत्या. या गैरव्यवहारात कब्रस्तान ट्रस्टला एक अधिकारी व प्रशासनावर आरोप करण्यात आले होते. त्यानुसार याप्रकरणी भादंवि कलम 465, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कबर असलेला ओटा विकण्याला कायद्याने परवानगी नाही. पण संबंधित कबरींसाठी देखभाल खर्च घेऊन त्या नियमित करण्यात येतात, पण त्यासाठी विश्वस्त मंडळाचा ठराव करण्यात येतो. तो मंजूर झाल्यास ती जागा संबंधित कुटुंबाची होते. ओटा विकण्यात आलेले मर्चंट कुटुंबीयही पूर्वी मेमन यांच्या कुटुंबीय होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांनी आडनाव मर्चंट म्हणून बदलले आहे. 

कोण होता याकुब मेमन
1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता; तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. याकुबने दहशतवादी कारवाया करण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे, तसेच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला 1994 मध्ये काठमांडू येथे अटक करण्यात आली होती. 

टाडा न्यायालयाने 2007 मध्ये याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही टाडा न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. व्यवसायाने चार्टड अकाउंटट असणारा याकुब हा या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार आणि फरारी आरोपी टायगर मेमन याचा भाऊ होता. 

याकुबला फाशी देण्याच्या टाडा न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयानेही समर्थन केले होते. त्यामुळे ऑक्‍टोबर 2013 मध्ये याकुबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याला जुलै 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यानंतर बडा कब्रस्तानमध्ये त्याला दफन करण्यात आले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com