राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकावर बैठका कशासाठी : मलिकांनी दिले उत्तर - Why so many meetings of NCP ministers held answers Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकावर बैठका कशासाठी : मलिकांनी दिले उत्तर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

महाविकास आघाडीत बैठकांवर सारखाच जोर... 

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंत्र्यांची पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यासोबत दीर्घ बैठक झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने समन्स पाठविल्याने राष्ट्रवादीत सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे देशमुख यांना अटक झालीच तर त्याला कसे तोंड द्यावे, याची रणनीती राष्ट्रवादीत ठरत आहे. (NCP decides strategy to defend Anil Deshmukh if he have been arrested by ED)

उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे  हे पक्षाचे नेते पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजर होते. त्या आधी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे हा नव्याने पुन्हा बैठकांचे सत्र कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले, ``आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीत संघटन वाढीबाबत तसेच महामंडळ नियुक्त्यांबाबत चर्चा झाली. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात आहे. त्यात कोणते मुद्दे येतील? कोरोनाची स्थिती कशी राहील, यावर मते व्यक्त झाली.  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी पक्षाची मागणी आहे. मात्र कोविडची परिस्थिती पाहून यावर निर्णय होईल. महाविकास आघाडांतील तिन्ही पक्षांत समनव्य आहे. भाजप लोकांमध्ये संभ्रम तयार करत आहे. मात्र त्यात अर्थ नाही. अधिवेशनाला आम्ही सक्षमपणे विरोधी पक्षांला उत्तर देऊ.

वाचा ही बातमी : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत 91 टक्के मतदान

अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले असले तरी  केंद्रातील सरकारच्या दबावाखाली काही अधिकारी काम करत आहेत, हे विसरून चालणार नाही. देशमुख हे सीबीआयसमोर गेले. तेथे तपास सुरू असताना राजकीय सूडबुद्धीने त्रास देण्याचे काम ईडीच्या आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. देशमुख हे तपासाला सहकार्य करीत आहेत. पक्ष हा देशमुख यांच्या पाठीशी आहे. पक्ष आणि सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे, असे मलिक यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या विभागातील निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्यामुळे ते नाराज आहेत काय यावर मलिक म्हणाले की  BDD च्या पुनर्विकासाबाबत या बैठकीत चर्चा झाली. तिथे वर्षानुवर्षे पोलीसांचे परिवार राहतात. ही घरे आम्हाला मालकी हक्काने मिळावीत, अशी पोलिसांची मागणी आहे.  त्याबाबत मार्ग काढण्यासाठी ही बैठक लावण्यात आली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड या वेळी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख