फडणवीसांनी विधानसभेत उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण? 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले.
  Dhananjay Gawde .jpg
Dhananjay Gawde .jpg

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. मनसुख हिरेन हे धनंजय गावडेंना शेवटचे भेटले होते. त्या ठिकाणापासून 40 किलोमीटरवर हिरने यांची बॉडी सापडली, असा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला. 

हिरेन प्रकरणात अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे फडणवीस म्हणाले. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर. त्यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. त्यातील एक नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा पोलिस अधिकारी सचिन हिंदुराव वझे. मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्याठिकाणी आहे. या लोकेशन पासून ४० किमी अंतरावर बाॅडी  सापडली. गावडेचे या ठिकाणी जाण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?, असे फडणवीस म्हणाले.

कोण आहेत धनंजय गावडे?

गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील नगरसेवक होते. ते पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 63 मधून नालासोपारा परिसरातून निवडून आले होते. मात्र, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. 

गावडे यांच्यावर फसवणूक, खंडणी मागणे आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर 2018 मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच 2016मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीत मिळाली होती.

एकूण 9 एफआयआर

गावडे यांच्यावर एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यात बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप होता. या एफआयआर 2015 ते 2018 दरम्यान, दाखल करण्यात आल्या. गावडेंवर वसई, नालासोपारा, तुलिंज, वालीव, विरार पोलिस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नोटबंदी काळात गावडे यांच्याकडे 1 कोटी 22 लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या. इन्कम टॅक्स अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेने सापळा रचून रंगेहाथ नोटांसह पकडले होते.

नगरसेवक म्हणून निवडून आल्या नंतर धनंजय गावडे यांनी माहितीचा अधिकारा अंतर्गत वसई-विरार मधील अनाधिकृत बांधकामाचे मोठे रॅकेट बाहेर काढले होते. 2016-17 मध्ये 1 कोटींची लाच मागितल्या प्रकरणी वसई विरार महापालिकेचे नगरचनाकार वाय एस रेड्डी यांना लाचलुचपत विभागाला पकडून दिले होते. गावडेकडून असा युक्तीवाद करण्यात आला की, आपण हे प्रकरण उघडकीस आणत होतो. अनधिकृत बांधकामांना परवानगी देण्यामध्ये महापालिकेतील काही अधिकारी आणि बिल्डर यांची साखळी होती. हाच पर्दाफार्श करत असल्याने, बिल्डरांकडून खोट्या तक्रारी दाखल करण्यात आले.  

आरोपांवर काय म्हणाले गावडे...

विरोधो पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांनी कोणावरही आरोप करताना विचार केला पाहिजे. असे आरोप करुन आयुष्यातून उठवून नका, अशी विनंती गावडे यांनी केली.

 हिरेन प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हिरेन मनसुख काळे की गोरे हे मला माहिती नाही. केवळ बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 12 दिवसांत माझ्यावर 10 खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर मी वसईत परतलो आहे. हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात आरोप पत्रातही माझे नाव नाही.

एनआयए संस्थेला तपास करुन द्यावा 

हिरेन मनसुख प्रकरणाचा तपास राष्ट्रीय यंत्रणा आणि एसआयटीकडून सुरु आहे. त्यांना तपास करुन द्यावा. हिरेन मनसुख यांचे लोकेशन केवळ वसईत सापडले म्हणून माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे धनंजय गावडे म्हणाले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com