शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व...राम कदम  - What kind of Hindutva of Shiv Sena ram kadam  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व...राम कदम 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचं कसलं हिंदुत्व आहे, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी टि्वटरवरुन उपस्थित केला आहे. 

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर कदम यांनी शिवसेनेला लक्ष केले. 

राम कदम आपल्या टि्वटमध्ये म्हणाले की, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागावी, राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचं हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे, असा सवाल कदम यांनी केला आहे.  

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
 
भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

सत्ता पडण्याची वाट पाहणारे हँग झाले

महाविकासाघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, अशी शाब्दिक कोटीही देखील त्यांनी केली होती. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही सत्तार त्यांनी दिले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख