पश्चिम बंगालच्या 30 तर आसाममधील 47 जागांसाठी मतदानाला सुरवात.. - west bengal assam elections 2021 live updates voting phase one voting today bjp tmc congress | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम बंगालच्या 30 तर आसाममधील 47 जागांसाठी मतदानाला सुरवात..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्यासाठी 30 विधानसभा जागांसाठी, तर आसाममध्ये 47 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 

कोलकाता : आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्यासाठी 30 विधानसभा जागांसाठी, तर आसाममध्ये 47 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 

विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. मात्र, बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच पसंती दिल्याचे ओपिनयन पोलमधून समोर येत आहे. एबीपी-सीव्होटरच्या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 148-164 जागा मिळू शकतात. तर भाजपला येथे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रस आणि डाव्या आघाडीला 31-39 जागा मिळू शकतात.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भाजप आमनेसामने

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

आसाममध्ये भाजपची सत्ता

2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. भाजपाल 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या. आसममध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सीएएचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे  

पश्चिम बंगाल : जागा - 294, टप्पे - 8, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल, टप्पा 4 - मतदान - 10 एप्रिल, टप्पा 5 - मतदान - 17 एप्रिल, टप्पा 6 - मतदान - 22 एप्रिल, टप्पा 7 - मतदान - 26 एप्रिल, टप्पा 8 - मतदान - 29 एप्रिल.

आसाम : जागा - 126, टप्पे - 3, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल.

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख