we can break parties in Maharashtra but this is not the timing says fadnavis | Sarkarnama

महाआघाडीचे आमदार आम्ही फोडू शकतो आणि सरकारही बनवू शकतो..पण?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 जून 2020

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोन वर्षांपूर्वीच बनले असते. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी हजर होतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर मी आणि अजित पवारांचे सरकार १०० टक्के टिकले असते, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार, अशी चर्चा सुरू असते. पण राजकीय घडामोडींची ही वेळ नाही. आमचे भाजपचे आमदार फुटणार, असाही दावा काही मंडळी करतात. तसे तर अजिबात होणार नाही. उलट आम्ही त्यांचे आमदार फोडू शकतो. पण आम्ही ते फोडणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला.

महाराष्ट्रात आॅपरेशन लोटस सुरू नसल्याचे सांगत आम्हाला सरकार आणायचे नाही. या परिस्थिती आमचे सरकार आणण्याची मानसिकता नाही. मात्र महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचे सरकार आहे, अशी सरकारे फार काळ चालत नाहीत. ते त्यांच्यातील अंतर्गत कलहाने पडेल. त्या वेळी योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  

फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट या मुलाखतीत केले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोन वर्षांपूर्वीच बनले असते. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी हजर होतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर मी आणि अजित पवारांचे सरकार १०० टक्के टिकले असते, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरे यांनी माझा फोनही विधानसभा निवडणुकीनंतर घेतला नाही, याचे मला जास्त वाईट वाटले. कारण त्या आधी पाच वर्षे मी त्यांचा शब्द कधीच खाली पाडला नाही. त्यांची वेळ घेऊन आणि ठरवून मी फोन केला. तरीही त्यांनी तो घेतला नाही, याचे मला वाईट वाटले. त्यांची आणि माझी चर्चा झाली असती तर नक्की मार्ग निघाला असता. सध्या ते ज्या पद्धतीचे सरकार चालवतात, अशी वेळ त्यांच्यावर आली नसती.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींनंतर मी पुस्तक लिहिणार असल्याचे सांगून ज्या वेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सोबत येत नाही असे लक्षात आले तेव्हा आम्हाला राष्ट्रवादीची आॅफर आली. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, असे सांगून थेट राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र नंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी ही आॅफर नाकारली. त्यानंतर अजित पवारांनी आम्हाला फिलर दिले. पवारसाहेबांनी आधी जे आम्हाला (भाजपला) आश्वासन दिले, तेच योग्य असल्याचे अजित पवारांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत आमचा शपथविधी झाला, असे त्यांनी सांगितले. ज्या वेळी तुमच्याशी सर्वजण धोका देतात, पाठीत खंजीर खुपसतात, अशा परिस्थितीत मनाविरुद्ध जाऊन गनिमी कावा केला आणि अजित पवारांसोबत शपथविधी केला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला म्हणून ते सरकार गेले. तो निर्णय आमच्या बाजूने लागला असता तर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केलेले सरकार नक्की टिकले असते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख