नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत  - Virar Hospital fire Narendra Modi Two lakh help from the families of the deceased | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

विरार येथे विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबई :  विरार येथे विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये. तर जखमींना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. टि्वट करुन ही माहिती देत मोदींनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी टि्वट करून संवेदना वक्त केल्या आहेत.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एससीचा स्फोट झाला. यातील पाच जणांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. पालकमंत्री दादा भूसे हे घटनास्थळी पोहचत आहे. 

या अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते.  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी ९० जणांवर उपचार सुरू होते. नाशिक येथील रुग्णालयाची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  

अजित पवारांकडून मृत रुग्णांना श्रद्धांजली 

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

विजय वल्लभ रुग्णालयातील मृतांची नावं 
१) उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४)  रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०)अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख