आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी  यादीत झाकीर नाईकचे नाव !

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी  यादीत झाकीर नाईकचे नाव !

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने झाकीर नाईकची आठवण वेगळ्या अर्थाने जपली आहे,

मुंबई : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे नाव असून ते नाव तत्काळ काढण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने झाकीर नाईकची आठवण वेगळ्या अर्थाने जपली आहे, असे भातखळकर यांनी उपहासाने म्हटले आहे. विद्यापीठाच्या, वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत झाकीर नाईक याचे नाव असून ते राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी भातखळकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

अनेक प्रकरणात झाकीर नाईक आरोपी असून तो बेपत्ता आहे. बेहिशोबी संपत्ती प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बांग्लादेश, इंग्लंड यांसह अनेक देशांमध्ये झाकीर नाईकला प्रवेशास व ऑनलाइन भाषण देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी बाब आहे.

 राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेबसाईटवरून झाकीर नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी भातखळकर यांनी केली आहे. याबाबत तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचे व आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सुद्धा भातखळकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in