union minister ramdas athawale reacts on sharad pawar interview published in samana | Sarkarnama

140 जागा मिळाल्या असत्यातरी भाजपने पवारांनाच पाठिंबा मागितला असता: आठवले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवारांनी भाजपसोबत यावे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुप्रिया सुळे यांचे भवितव्य आहे, अशी सूचनाही आठवले यांनी केली आहे.

पुणे: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीवर रिपब्लिकन नेते आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेला सोबत न घेता भाजप एकटा लढला असता तर 140 जागा मिळाल्या असत्या, असा दावा त्यांनी केला आहे.

'सामना'च्या मॅरेथॉन मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. विधानसभेला शिवसेना बरोबर होती म्हणून भाजपला 105 जागा मिळाल्या. त्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. जर शिवसेना भाजपसोबत नसतीतर त्यांना 40-50 ही जागा मिळाल्या नसत्या, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याला रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. भाजपा एकटी लढली असतीतर 140 जागा मिळाल्या असत्या, असे त्यांनी म्हटले आहे. त्यापरिस्थितीत शरद पवार यांच्याकडेच पाठिंबा मागितला असता, असेही आठवले म्हणाले आहेत. 

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवारांनी भाजपसोबत यावे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुप्रिया सुळे यांचे भवितव्य आहे, अशी सूचनाही आठवले यांनी केली आहे.

राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहत असून अनेक निर्णय राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. राज्यात तीन पक्षांचे सरकार असलेतरी शिवसेना कुणाचे ऐकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे. शरद पवारांनी शिवसेनेसोबत राहू नये. त्यांनी देशाच्या भल्यासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा, असेही आठवले यांनी म्हटले आहे. 

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका

मुंबई: 'एक शरद शिवसेनेचे बाकी सगळे गारद' असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची विस्तृत मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत खळबळजनक असल्याचा दावा केला जात आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. 'एक शरद सगळे गारद' अशी टॅगलाईन आहे. आता या टॅगलाईनवरून राज्यभरात टीकाटिप्पण्णी सुरू आहे. मुख्यत: भाजपकडून या मुलाखतीवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, शिवसेनेत बोलण्यासाठी कोणीच नाही म्हणून शरद पवारांना नेतृत्व करावं लागत आहे. एक शरद शिवसेनेचे बाकी सगळे गारद, अशी परिस्थती आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचीच कामे होत नाही. शिवसेनेच्या नेत्यांना कोणी भेटतही नाही. 

edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख