केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून  राज्यात 24 बंदरांना मान्यता - Union Fisheries Minister approves 24 ports in the state | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून  राज्यात 24 बंदरांना मान्यता

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

वर्सोवा येथे मच्छिमार बंदर उभारण्यासह राज्यात आणखी 15 मच्छिमार बंदरे व नऊ बंदरांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.  

मुंबई : वर्सोवा येथे मच्छिमार बंदर उभारण्यासह राज्यात आणखी 15 मच्छिमार बंदरे व नऊ बंदरांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.  

केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील प्रकल्पांचा सावंत यांच्यातर्फे पाठपुरावा केला जात आहे. त्यातच राज्यात 16 मच्छिमार बंदरे आणि वाहतुकीसाठी नऊ बंदरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. राज्याचा हा प्रस्ताव सन 2017 पासून प्रलंबित आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री गिरीराज सिंह यांना पत्र पाठवले होते. 

राज्याला सव्वासातशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारपट्टीवर 53 बंदरे आहेत. त्यातच ही नवी बंदरे बांधली तर राज्याचा महसूल वाढेल तसेच जास्त मच्छिमारांना काम मिळून त्यांची भरभराट होईल.

त्यामुळे या प्रस्तावात त्वरेने लक्ष घालून त्यांना मान्यता द्यावी, असे पत्र सावंत यांनी सिंह यांना 9 मार्च रोजी पाठवले होते. त्याचे सिंह यांनी नुकतेच उत्तर दिले असून हा प्रस्ताव आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.  यामुळे आता या बंदरांचे काम लवकरच मार्गी लागेल, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : भाजप प्रदेश नव्या कार्यकारीणीची आज बैठक... 

मुंबई :  महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक आज होत आहे. भारतीय जनता पक्षाने ता. ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारीणीची ही पहिलीच बैठक आहे.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.   दिल्ली येथून जे. पी. नड्डा हे बैठकीत सहभागी होतील, तर  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच झालेला दिल्ली दैारा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर केलेली टिका, सरकार पाडून दाखविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आव्हान आदी विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. अनेक विषयावर होत असलेल्या या बैठकीकडे भाजपसह महाविकास आघाडीचेही लक्ष आहे. 

केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांची वर्णी लागण्याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या सर्वांत शक्तीशाली अशा संसदीय मंडळात नियुक्ती होण्याची कुजबुज आहे.  पक्षाध्यक्षांच्या गोटातून समजलेल्या माहितीनुसार नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा या महिन्यात होण्याची शक्‍यता अंधूक असून ती ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास होऊ शकते. 

Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख