An unconscious Mumbai Municipal Corporation employee did not get an ambulance for an hour | Sarkarnama

बेशुद्ध पडलेल्या मुंबई पालिका कर्मचाऱ्यास तासभर रुग्णवाहिका मिळाली नाही

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुंबई महापालिका मुख्यालयात विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचारी अजित दुखंडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. मात्र, त्यापूर्वी तासभर आधी ते बेशुद्ध असताना रुग्णवाहिका मिळाली नाही, या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचारी अजित दुखंडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. मात्र, त्यापूर्वी तासभर आधी ते बेशुद्ध असताना रुग्णवाहिका मिळाली नाही, या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

मुंबईत महापालिका मुख्यालयातच अजित दुखंडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. डॉक्‍टरांनी त्यांना तपासून तातडीने रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, कार्यालयात बेशुद्ध पडलेल्या दुखंडे यांना एक तास रुग्णवाहिकाच मिळाली नाही, असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हा प्रकार संतापजनक असून या प्रकारची तातडीने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करावी, अशी मागणी लोढा यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. 

 

महापालिका मुख्यालयात रुग्णवाहिका पोहोचायला एक तास का लागला, एकशे आठ क्रमांकाचा रुग्णवाहिका नसली तर दुसरी खासगी रुग्णवाहिका का मागवली नाही, मुख्यालयात स्वतःची रुग्णवाहिका का उपलब्ध नाही, उपलब्ध असेल तर ती का वापरली गेली नाही, अजित दुखंडे यांच्यावर प्रथमोपचार का झाले नाहीत, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉक्‍टरने त्यांच्यावर काय उपचार केले, दुखंडे यांचे प्राण वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय हालचाली केल्या, त्यांना जवळच्या सेंट जॉर्ज किंवा जीटी रुग्णालयात नेण्याऐवजी लांबच्या नायर रुग्णालयात नेण्याचा निर्णय का घेण्यात आला. महापालिका मुख्यालयात बेशुद्ध पडलेल्या रुग्णाला मदत मिळत नाही, हेच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आहे का, असे प्रश्न मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात उपस्थित केले आहेत. 

महापालिका मुख्यालयातील कर्मचारीच जर वैद्यकीय मदतीअभावी असुरक्षित असतील तर महापालिका सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची कशी हमी देणार, असा प्रश्नही मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लोढा यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकारांची अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी. येत्या आठ दिवसांत त्याचा अहवाल लोकप्रतिनिधींसमोर ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

हेही वाचा : पिंपरीत आणखी एका नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन 

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे शुक्रवारी (ता. 31 जुलै) कोरोनामुळे निधन झाले. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचे आणखी एक विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले आहे. एका महिन्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नगरसेवकांचे पिंपरीत निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नगरसेवक शेख यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती आणखी बिघडल्याने बुधवारी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शेख हे 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 2012 व 2017 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख