उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ यावे  - Uddhav Thackeray should come with BJP and made government in the state : Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ यावे 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे यांना ‘बॅक टू पॅव्हेलियन’ येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा येऊन राज्यात सत्ता स्थापन करावी, असेही आठवले यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray should come with BJP and made government in the state : Ramdas Athavale)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला परत भाजपशी युती करण्याचे आवाहन केले. आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती करून राज्यात सरकार बनवावे, असे व्यक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. 

हेही वाचा : बारामतीच्या चहावाल्याने केली पंतप्रधान मोदींना शंभर रुपयांची मनीऑर्डर 

‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे आवाहन आहे की त्यांना शिवसेना मजबूत उभी करायची असेल. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आपण (शिवसेना) ‘बॅक टू पॅव्हेलियन’ आले पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा आलं पाहिजे आणि राज्यात सरकार स्थापन केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी मोदी आणि ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर आज (ता. ९ जून) दिली.

रामदास आठवलेंनी घेतली शरद पवारांची भेट

दरम्यान, रामदास आठवले यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही ‘सिल्व्हर ओक’ वर जाऊन भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये, ही अट शिथिल करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेत सर्वपक्षीयांनी एकत्रि प्रयत्न करण्याची गरज आहे, यावर रामदास आठवले आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात चर्चा झाली.  मतैक्य  झाले. मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबत विचारविनिमय झाला. मराठा अरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत शरद पावर यांनी व्यक्त केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत. आपणही केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते, त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली. त्यावर पवार म्हणाले की, राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रिमंडळाशी चर्चा करून लवकरच अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख