ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोनशे कोटी मुंबईत पाठवले होते : संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Two hundred crore was sent to Mumbai to overthrow Thackeray government: Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोनशे कोटी मुंबईत पाठवले होते : संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.

मुंबई : कोणीही किती प्रयत्न, कारस्थान, चिखलफेक केली, तर महाराष्ट्राचे ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. तारखा कितीही द्या, पण सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण, राज्यातील अकरा कोटी जनतेचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या स्थिरतेविषयी पुन्हा एकदा विश्‍वास व्यक्त केला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मुंबईत दोनशे कोटी गेले आहेत, असे दिल्लीत सांगितले जाते. पण, मी त्यांना म्हणतो तो आमचा अपमान आहे. आमच्याकडे महापालिकाच्या निवडणुकीत एवढा खर्च होतो, असे मी त्यांना उत्तर दिले, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी या वेळी केला. 

राऊत म्हणाले की, "चालू पाच वर्षे हे सरकार टिकणार म्हणजे टिकणारच. ही पाच वर्षे नाही, तर पुढील 25 वर्षांचा जनतेशी करार करून हे महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत येईल.' 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी राऊत बोलत होते. मेळाव्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आनंदराव आडसूळ, अनंत गिते प्रामुख्याने उपस्थित होते. 

"अभूतपूर्व परिस्थितीत आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. सर्वकाळी सुरळीत असते, तर जगाने नोंद घेतली असा दसरा मेळावा झाला असता. दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. गेल्या वर्षी त्याला सुरुवात झाली. असत्यावर सत्याचा विजय झाला,' असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. 

शिवसेनेबाबत यापुढे "महा' असेच होणार आहे. हा महा घेऊन शिवसेना दिल्लीचे तख्त राखायला गेली, तर आश्‍चर्य वाटणार नाही. कारण, मी गेल्या वर्षीच म्हणालो होतो की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले. संघर्ष करून पुढचाच मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, हे संकेत त्या वेळी आम्हाला मिळाले होते, असा दावाही संजय राऊत यांनी या वेळी केला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख