संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत दोन गट? संजय राऊत म्हणाले... - Two groups in Shiv Sena over Sanjay Rathores resignation | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत दोन गट? संजय राऊत म्हणाले...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, यावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याची माहिती समोर येत आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावी, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर त्यांनी राजीनामा दिल्यास आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला घेण्यात आले आहे. वनमंत्री संजय राठोड हेच पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही दबाव वाढला आहे. पण राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतच दोन गट पडले आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप झाले होते. विरोधकांनी त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती. पण मुंडेंनी सोशल मिडियावर आपली बाजू मांडली. त्यांनी अखेरपर्यंत राजीनामा दिला नाही. हाच मुद्दा पुढे करून शिवसेनेतील एक गट राठोड यांच्या राजीनाम्याच्या विरोधात असल्याचे समजते. त्यांनी राजीनामा दिल्यास आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा : राम मंदिरासाठी निधी न देणाऱ्यांच्या घरांवर वेगळ्या खुणा, कुमारस्वामींचा आरोप

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मात्र राठोड यांच्यावरून शिवसेनेत दोन गट नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारमधील प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. त्यावरून शिवसेनेत कोणतेही गट नाहीत.''

पोलिस तपास अद्याप सुरू...

मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या दाव्यानुसार, तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख