आजची सर्वात मोठी घडामोड : भाजपला रामराम केलेले नाथाभाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

गेल्या बुधवारी खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा दोन ओळीत राजीनामा दिला होता.
आजची सर्वात मोठी घडामोड : भाजपला रामराम केलेले नाथाभाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई : भाजपला रामराम केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राज्यातील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे. 

गेल्या बुधवारी खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा दोन ओळीत राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला केला होता. केवळ आणि केवळ फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला. त्यांनी आपल्याला त्रास दिला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी म्हटले होते. 

जवळजवळ चार दशकं भाजप घालविलेल्या खडसे यांच्या सारख्या नेत्यांना पक्षाला सांभाळून ठेवता आले नाही. राज्यात 2014 मध्ये जेव्हा भाजपचे सरकार आले त्यावेळी खडसेंना वाटले होते, की आपणास मुख्यमंत्री केले जाईल. पण, तसे काही झाले नाही. फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्या दिवसापासून या दोन्ही नेत्यांमध्ये खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरवात झाली. खडसे हे फडणविसांच्या मंत्रिमंडळातही होते. पुढे त्यांना भोसरी जमीन घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला. गेली चार वर्षे ते भाजपत होते. या वर्षात त्यांनी फडणविसांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

आता भाजप सोडल्यानंतर ते अधिकच आक्रमक झालेले दिसून येत आहे. फडणवीस यांच्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊ शकली नाही. आमच्या सारख्या नेत्यांची तिकीट कापली त्यामुळे पक्षाला कमी जागा मिळाल्या असेही खडसे यांनी त्यांना लक्ष्य करीत हल्लाबोल सुरू ठेवला आहे. 
आज दुपारी खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी पक्षाचे रथीमहारथी उपस्थित राहाणार आहेत. खडसे कालच पत्नी, मुलगीसोबत मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांचे काही समर्थक मुंबईत दाखल झाल्याचे कळते. 

दरम्यान, खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी भाजप सोडला नाही. त्या भाजपमध्येच राहाणार आहेत. मात्र मुलगी रोहीणी भाजप सोडणार असून त्या आता राष्ट्रवादीचे काम करणार आहेत. तसेच धुले, जळगाव, नंदुरबार येथील खडसे समर्थक भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे कळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com