कोरोनाबाबत 'भाषणबाजी' बंद करावी... - Time to act and not give lectures: Fadnavis to Maha govt over recent COVID-19 spike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोनाबाबत 'भाषणबाजी' बंद करावी...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

महाराष्ट्र हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले असून राज्य सरकारने कोरोनाबाबत भाषणबाजी तातडीने बंद करून कोरोनाची स्थिती आवाक्यात कशी आणता येईल, याबाबत प्रत्यक्ष कृतीआराखडा तयार करून काम करावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुंबई: देशातील कोरोनाची स्थिती काही प्रमाणात आवाक्यात असतानाच महाराष्ट्रातील स्थिती मात्र गंभीर बनली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून तरीही राज्य सरकार याबाबत गंभीर नाही. महाराष्ट्र हे कोविडचे केंद्रबिंदू बनले असून राज्य सरकारने कोरोनाबाबत भाषणबाजी तातडीने बंद करून कोरोनाची स्थिती आवाक्यात कशी आणता येईल, याबाबत प्रत्यक्ष कृतीआराखडा तयार करून काम करावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला. 

फडणवीस म्हणाले, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असूनही राज्य सरकारला याचे काहीही घेणे-देणे नाही. ठाकरे सरकारने कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याकरिता काहीही उपाययोजना केल्या नसून ही वेळ भाषणबाजीची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. याबाबत सर्व स्तरांवर गांभीर्याने विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे, तरच स्थिती नियंत्रणात येईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ४७ हजार २६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७५ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील कोरोनाची स्थिती आणखी बिकट असून २४ तासात तब्बल २८ हजार ६९९ रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने १  एप्रिलपासून मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असून संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन करता येणार नाही, असेही सांगितले आहे. 

त्यामुळे महाराष्ट्र सरकार कोरोनाला अटकाव कसा घालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोनाच्या रुग्णांचे विलगीकरण करणे, गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. दरम्यान, १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मिळेल, असे केंद्र सरकारने मंगळवारीच जाहीर केले आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख