सचिन वाझेंबाबत तपासात चूक झाली..संजय राऊतांची कबुली  - There was a mistake in the investigation about Sachin Wazen bjp leader Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंबाबत तपासात चूक झाली..संजय राऊतांची कबुली 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

"सचिन वाझे प्रकरणामुळे सरकारच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : "पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत तपासात चूक झाली, अशी चुक पुढे पोलिस करणार नाहीत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. वाझे प्रकरणामुळे सरकारच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही," असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

संजय राऊत म्हणाले, "सरकार कोणाचेही असले तरी पोलिस यंत्रणा ही सरकारचाच एक भाग असते. संपूर्ण प्रशासनन यंत्रणा ही सरकारची असते. हे आपण नाकारू शकत नाही. एखाद्याने जर चुक केली तर त्याला सरकार जबाबदार असते. चुकीच्या विषयाची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांच्या बदल्या केल्या आहेत. पहिल्यांदाच असा मोठा बदल केला आहे. मुंबई पोलिस दलाची फेररचना करण्यात येत आहे." 

 राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे "शिळ्या कढीला ऊत"

'सामना'च्या अग्रलेखातून सचिन वाझेंना तुम्ही पाठिंशी घालत आहात. वाझे हे शिवसेनेत होते. त्यांच्यावर आरोप केले जात आहे, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "या प्रकरणाची तपासणी एटीएस, एनआयए करीत आहे. तपास न करता एखाद्या व्यक्तीला आपण फासावर लटकू शकत नाही. सचिन वाझेंनी चुक केली असेल तर त्यांना त्याची शिक्षा मिळेल. एखाद्या पक्षाचा सदस्य असणं हा काही गुन्हा नाही. शिवसेना हा देशातील राजकीय पक्ष आहे, त्याचे काही तत्व आहेत, शिवसेनेची विचारसरणी ज्यांना आवडते ते शिवसेनेत काम करतात. सचिन वाझे हे दोषी आहेत की नाही याचा तपास सुरू आहे. एनआयएचे काम अतिरेकी कारवाया रोखणे आहे, त्यांनी देशातील अन्य ठिकाणी लक्ष्य द्यावे, मुंबईत 20 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्यांचामागे एनआयए, केंद्र सरकार, विरोधक लागले आहेत. याचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही." 

सचिन वाझें प्रकरणात काही मंत्र्यांची सहभाग असल्याची शक्यता राऊत यांनी फेटाळून लावली. "पोलिस महासंचालकांनी काल सांगितले की पोलिसांकडून जी अशी चूक झाली ती यापुढे होणार नाही. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. पुढचे साडेतीन वर्ष आमच्या सरकारला धोका नाही. पुढची निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एकत्र लढणार आहे", असे राऊत यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख