राजकीय विरोध असावा; परंतु वैर नसावे... - There should be political opposition; But there should be no animosity. | Politics Marathi News - Sarkarnama

राजकीय विरोध असावा; परंतु वैर नसावे...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

कार्यकर्त्यांनी राजकारणात जरूर यावे. परंतु आधी आपली पारिवारिक जबाबदारी कशी पार पडेल हे बघावे. कारण कुटुंब हीच पहिली प्राथमिकता असायला हवी. आज ही पोस्ट लिहिण्याचे कारण की ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर नेता घडतो त्याच्याबद्दल असलेली आपुलकीची भावना. त्यामुळे राजकारण करताना वैचारिक विरोध असावा , वैयक्तिक नव्हे', अशी फेसबुक पोस्ट बाळा नांदगावकर यांनी टाकली. 

मुंबई: राजकारणात सध्याच्या घडीला अत्यंत खालच्या थरातील टीका करण्यात येत असून वेळप्रसंगी ती टीका, आरोप समोरच्याचे आयुष्यही उध्वस्त करू शकते. राजकारण जरूर करावे, मात्र वैयक्तिक टीका करण्याचे टाळावे. वैयक्तिक टीकेमुळे सर्वांचेच नुकसान होत असून मित्र, नातेवाईकही दुरावतात. त्यामुळे टीका ही कधीही वैयक्तिक पातळीवर नसावी, असा सल्ला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पेजद्वारे राजकारणातील कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, नेमक्या कोणकोणत्या कार्यकर्त्यांना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.    

'दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावत चालला आहे. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा आहे. परंतु सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगात नवीन पिढी ही पक्ष , आवडता नेता यांच्यासाठी लढताना अगदी वैयक्तिक पातळीवर घसरत आहे. मित्रांनो, राजकीय विरोध असावा, परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासाठी वैयक्तिक संबंध पणाला लावत आहात, तेच अनेकदा "अभद्र आघाडी" करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणतात. तसेच कार्यकर्त्यांनी राजकारणात जरूर यावे परंतु आधी आपली पारिवारिक जबाबदारी कशी पार पडेल हे बघावे. कारण कुटुंब हीच पहिली प्राथमिकता असायला हवी. आज ही पोस्ट लिहिण्याचे कारण की ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर नेता घडतो त्याच्याबद्दल असलेली आपुलकीची भावना. त्यामुळे राजकारण करताना वैचारिक विरोध असावा , वैयक्तिक नव्हे', अशी फेसबुक पोस्ट बाळा नांदगावकर यांनी टाकली. 

दरम्यान, बाळा नांदगावकर यांच्या फेसबुक पोस्टवर नागरिकांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपणच एकत्रित आणू शकता, खूप मोलाचा सल्ला, 100 टक्के सहमत, आजच्या घडीला याच मार्गदर्शनाची गरज होती, एकदम वास्तव आणि समर्पक, राजकारण विचारधारा नैतिकता, निष्ठा बासनात गुंडाळून ठेवली पाहिजे, दर्जा शब्दांचा ढासळला तरी चालेल पण माणूस ढासळलेला नाही चालणार, इतक्या पारदर्शकपणे आपणच मत मांडू शकता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने व्यक्त केल्या.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख