...तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही - then the Congress will not be able to retain even 40 seats | Politics Marathi News - Sarkarnama

...तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.

मुंबई : देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.  सोमवार (ता.१५ फेब्रुवारी) रोजी पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे. यामुळे सातत्याने देशाच्या संरक्षण मंत्रालयाबद्दल अपप्रचार करणारे खासदार राहुल गांधी व कॉंग्रेसचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. असाच खोटारडेपणा भविष्यातही सुरु ठेवल्यास लोकसभेतील सध्याच्या 40 जागाही टिकविण्यासाठी कॉंग्रेसला कसरत करावी लागेल, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

'अर्जुन एम के 1 ए' हा लढाऊ रणगाडा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या  (DRDO) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने तायर केला आहे. या लढाऊ रणगाड्याला हंटर किलर रणगाडा असेही म्हटले जाते, असे सांगत पाटील म्हणाले की, देशाचा संरक्षण विभाग सक्षम असतानाही राहुल गांधी मात्र वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून विनाकारण अपप्रचार करीत आहेत.

काँग्रेसला चार आमदारांचा 'दे धक्का' : या राज्यातील सरकार अल्पमतात...
 

राहुल गांधी  यांनी २०१८ मध्येही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या कंपनीच्या कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना मोदी यांच्या कार्यपध्दतीची चुकीची माहिती दिली व त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदी एचएएल सारख्या कंपन्यांची उत्पादन क्षमता कमी करत, असल्याची चुकीची माहिती दिली होती. त्यांची ही वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला हेतुपुरस्सरपणे बदनाम करण्याचा प्रकार असून तो निंदनीय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

कांग्रेसच्या खोटारडेपणाच्या राजकारणामुळे 400 जागांवरुन कॉंग्रेसला सध्या फक्त 40 जागा कशाबशा टिकविता आल्या. भविष्यात अशीच परिस्थिती राहली तर कॉंग्रेस पक्ष हा इतिहासात समाविष्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना या गोष्टींचे लवकरच आत्मचिंतन केल्यास ते त्यांच्यासाठी व कॉंग्रेससाठीही नक्कीच हिताचे असेल असा, टोलाही पाटील यांनी मारला आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट? संजय राऊत म्हणाले...
 

२०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत माहिती देताना स्पष्ट केले होते की, केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीसाठी एचएएल या कंपनीसमवेत १ लाख कोटीचे कंत्राट केले आहे. तरीही राहुल गांधी व कॉंग्रसेने यासंदर्भात जनतेला खोटी माहिती देऊन देशाच्या संरक्षण विभागाची बदनामी केली होती.

त्यानंतर संरक्षण विभागानेही या कंत्राटासंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे माध्यमांमार्फत सादर करुन राहुल गांधी यांच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश केला होता. केवळ चीनच्या कथित मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास एक दिवस जनताच तुमच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश करेल व ही वेळ दूर नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख