सावंतांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार !, शेलार यांचा पलटवार  - Thank you Sawant for revealing the truth in madness !, Shelar's retaliation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सावंतांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार !, शेलार यांचा पलटवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आरेची जागा व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. त्याला भाजपच्या आशिष शेलारांनी उत्तर दिले आहे. 

मुंबई : आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला,

कॉंग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत यांनी स्वतःच उघड केले. त्यामुळे त्यांचे आभारच मानायला हवेत, असा पलटवार भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. 

आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती, असा आरोप करून सचिन सावंत यांनी अज्ञानाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करीत, अतिशहाणपणाचा भाग-2 सादर केला आहे. त्याचा कागदोपत्री पुरावे सादर करुन शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच कॉंग्रेसचे पितळ उघडे पाडले. 

सावंत यांनी आता हे सारे बोलून महाराष्ट्राचे विद्यामान मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना पण संशयाच्या भोवऱ्यात आणले आहे. कारशेड स्थलांतरीत करुन आरेतील जागेचा वापर अन्य गोष्टींसाठी करणार असे सागणारे विद्यमान मुख्यमंत्री, या जागेचा वापर नेमका कशासाठी करणार ? की सत्तेतील पार्टनर असलेल्या कॉंग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री मदत करणार ? असा सवाल ही आता या निमित्ताने उपस्थित होतो. 

त्यामुळे या जागेचा वापर व्यवसायीक कारणासाठी होणार.नाही याचे वचन मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे. तर सचिन सावंत हे रोज अशाच प्रकारे बोलत राहिले तर अजून बरेच बाहेर येईल, त्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असा टोला ही शेलार यांनी लगावला आहे. 

अधिक माहिती देताना आमदार शेलार म्हणाले, की राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात 3 मार्च 2014 रोजी नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक एमआरडी-3311/प्र.क्र. 149/नवि-7 जारी केला. त्यातील परिच्छेद क्रमांक 10 चे छायाचित्र सोबत जोडले आहे.

हा शासन आदेश म्हणतो की, आरेलगतची 3 हेक्‍टर जागा ही प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात यावी. सुमारे 1000 कोटी रूपये यातून उभे करण्याचा कॉंग्रेस सरकारचा प्रयत्न होता. पण, भाजपा सरकारने हा प्रयत्न हाणून पाडला. असे असताना सावंत हे आरोप का करीत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीस सरकारने जेव्हा सर्व जागांचे पर्याय पडताळून पाहिले आणि आरेचीच जागा योग्य असल्याचा निष्कर्ष काढला, तेव्हा त्याची अधिसूचना काढताना आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर होणार नाही, असे अंतिम अधिसूचनेत स्पष्टपणे अधोरेखित केले. या 9 नोव्हेंबर 2017 च्या अंतिम अधिसूचनेतील संबंधित विषयाचे छायाचित्र सुद्धा सोबत जोडले आहे. सर्व बाबी अतिशय स्पष्ट आहेत त्यामुळे आम्हाला रोज सत्य उघड करण्याची संधी देणाऱ्या सावंतांचे आभार, असेही शेलार यांनी म्हटले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख