ठाकरे, दरेकरांना कोरोना झाला तर बिल माझ्यावर फाडू नका! - Thackeray, if everyone gets corona, don't tear the bill on me | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे, दरेकरांना कोरोना झाला तर बिल माझ्यावर फाडू नका!

उत्तम कुटे 
गुरुवार, 4 मार्च 2021

राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी सव्वातास भाषण केले. त्यात सदस्यांनी उपस्थित केलेल्या बहूतांश मुद्यांना स्पर्श केला.

मुंबई : रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला नाही. तो होऊही नये. पण, चुकून झालाच, तर माझी दृष्ट लागल्याचे सांगत त्याचे बिल माझ्यावर फाडू नका, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत करताच त्याला सदस्यांनी मनमोकळी दाद दिली. त्यामुळे अगोदरचे तणावाचे वातावरणही मोकळे झाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या वरील वक्तव्याने सभापती, विरोधी पक्षनेते तसेच मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी सव्वातास भाषण केले. त्यात सदस्यांनी उपस्थित केलेल्या बहूतांश मुद्यांना स्पर्श केला. त्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनीही तपशीलवार भाषण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्याचे मनापासून अभिनंदन केले. अजितदादांनी भाषण न गुंडाळता प्रत्येक मुद्याला हात घातल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एकमेकांचे कौतूक करूया, असे सांगत त्यांनी फिरकी घेतली. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला.

तामिळनाडूत राजकीय भूकंप : शशिकलांची राजकारणासह सार्वजनिक जीवनातून तडकाफडकी निवृत्ती

 

कोरोना साहित्य खरेदी व जंबो हॉस्पिटल तथा कोरोना सेंटर उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर तो झाला असेल, तर त्याचे पुरावे द्या, कारवाई करतो. कुणाला पाठिशी घालणार नाही, असे आपल्या शैलीत अजितदादा म्हणाले. कोरोनात सुरवातीला दिलेली मदत नंतर केंद्राने थांबवल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिमटा काढला. पण, केंद्राने किती मदत दिला या वादात जायचे नाही, असे पुढे म्हणत त्यांनी आपले भाषण सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेतली.

बीड जिल्हा बॅंकेचा वाद राज्यपालांच्या दारात 
 

चक्रीवादळ, भूकंप, महापूर अशा संकटांचा सामना यापूर्वी केला. पण, पन्नास वर्षात प्रथमच कोरोनाचे संकट अनुभवले. त्याचा कसा सामना राज्य सरकारने केला, त्याचा उहापोहही त्यांनी केला. सध्या पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असले, तरी मृत्यूदर कमी आहे, ही समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले. कोरोनाचाच संदर्भ पकडून माझ्यासह इतर मंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोना झाला. पण, एका गोष्टीचे विशेष आहे, ठाकरे, दरेकर आणि निंबाळकर यांना तो झाला नाही, असे ते म्हणताच सभागृहातील तणाव एकदम निवळला. 

कोरोनाचे संकट टळलेले नाही, असे सांगत त्यांनी मास्क वापराच असे सांगितले. पण, तुमचे पूर्वीचे नेते (राज ठाकरे) तो वापरत नाहीत, असे ते दरेकरांच्या दिशेने पाहत म्हणाले. त्यावर पुन्हा सभागृहात स्मितहास्याची लहर उमटली. पण मास्क न वापरणाऱ्याला कोरोना झाला, तर इतरांनाही होऊ शकतो, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख