तन्मयने घेतली लस..काका देवेंद्र फडणवीस ट्रोल.. इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? - tanmay fadnavis vaccination devendra fadnavis troll | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

तन्मयने घेतली लस..काका देवेंद्र फडणवीस ट्रोल.. इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल होत आहेत.

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय यांने  कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे.  एकीकडे राज्यात लस, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याची परिस्थिती असताना ४५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या फडणवीसाचा पुतण्या तन्मय याला लस दिलीच कशी ? यावरुन कॅाग्रेस आणि नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित करीत फडणवीसांना धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर फडणवीस ट्रोल होत आहेत.

फडणवीसांच्या पुतण्या तन्मय याने कोरोनाची दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर कॅाग्रेससह अनेकांनी यावर आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कॅाग्रेसने टि्वट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

''४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!,'' असे टि्वट कॅाग्रेसने केले आहे. 
 
नाव… तन्मय फडणवीस, कोण… देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का ?, तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल, तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,” असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  
Edited by: Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख