IPS नांगरे पाटील फडणवीसांना का घाबरतात ?....

सुरेश खोपडे यांनी पोलिस अधिकारी आणि त्यांचे असलेले राजकीय हितसंबंध यावर निशाणा साधला आहे.
Sarkarnama Banner (79).jpg
Sarkarnama Banner (79).jpg

पुणे : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड हे पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब विचारला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेबाबत माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांची फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

सुरेश खोपडे यांनी पोलिस यंत्रणा, पोलिस अधिकारी आणि त्यांचे असलेले राजकीय हितसंबंध यावर निशाणा साधला आहे.  ''देवेंद्र फडणवीस, पोलिस अधिकारी यांचा पोलिस ठाण्यातील संवादाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पु.ल.देशपांडे यांची म्हैस ही कथा पुन्हा ऐकली,'' अशी कोपरखळी सुरेश खोपडे यांनी मारली आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सुरेश खोपडे म्हणतात..

"नांगरे पाटील (व मंडळी) भिऊ नकोस!.... तुझ्या पाठीशी आहे!"

एक व्हिडिओ पाहिला. स्थळ मुंबईतील एक पोलिस स्टेशन. पोलिस अधिकाऱ्यांला देवेंद्र फडणवीस चढ्या आवाजात हात वारे करत  विचारत होते. "तुम्ही त्यांना धमकी का दिली?"  मला सुरवातीला वाटलं पोलिसांनी फडणवीसांना धमकी दिली असावी. पण तसे नव्हते. फडणवीस पोलिसांना दमात घेत होते. अधिकारी सभ्यपणे उत्तर देत होते. पण असा सभ्यपणा फक्त या जाकीटधारी पुढेच का ?

पु. ल. देशपांडेंची म्हैस ही कथा पुन्हा ऐकली. अपघात झाल्यावर पंचनामा करण्यासाठी आलेला एक बेरक्या हवालदार त्यांनी अफलातून उभा केलाय. तिथं ही जाकीट घातलेल्या पुढाऱ्यापासून लुडबुड करणाऱ्या सर्वांचा आवाज बंद करून त्यांची जागा त्यांना कशी दाखवतो हे ऐकून धमाल येते. 

"तुमि मंधी मंधि बोलू नका ओ, आमाला आमच्या लायनी परमान जावू दया!" हा हवालदाराचा डायलॉग वास्तव वाटतो. कथेतील हवालदार साध्या कपड्यातील ऑर्डर्ली असतो. व्हिडिओतील त्या पोलिस स्टेशनमध्ये तर क्लासवन आयपीएस अधिकारी होते. ज्याला धमकी दिली त्यानेच आपली तक्रार मांडायला पाहिजे इतरांना लुडबुड करता येत नाही. इतर सामान्य माणूस त्या ठिकाणी असता तर पोलिसांनी आवाज चढवून बडबड बंद करायला सांगितली असती व ऐकले नसते तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला असता. दोन वर्षापूर्वी दिलेली तक्रार नागपूर पोलिसांनी घेतली नव्हती म्हणून पोलिस महासंचालकांना भेटायला आम्ही गेलो होतो. माझ्या सोबत असलेले विकास लवांडे हे कार्यकर्ते बोलू लागले तर  "तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावरच गुन्हा दाखल करील" असा दम सुहास वारके या आयपीएस अधिकाऱ्याने दिला होता.

महाराष्ट्र पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारा व मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले असे म्हणणारे हेच ते फडणवीस.  मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेमलेले विश्वास नांगरे पाटील कुठे होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ? मुंबई पोलिसात तीस पेक्षा जास्त IPSअधिकारी आहेत. त्यांना फडणवीस यांचा शेरा मान्य आहे का ? कनिष्ठ अधिकारी व  कॉन्स्टेबल यांचा मान सन्मान,अस्मिता, यांच्याशी तुम्हाला देणे घेणे नाही हे मी पाहिले आहे. पण तुम्हाला तरी आत्मसन्मान आहे की नाही ? नसावा ! उगवत्या सूर्याला हात जोडत फायद्याच्या नेमणुका, परदेश वारी, सरकारी प्लॉट.... यातच तुम्ही अडकलेले दिसता ! सामान्य जनता मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या शिपायाला शिव्या शाप देत आपला राग व्यक्त करते.

हे जॅकेटधारी मुंबई पोलिसांना बदनाम करून दमबाजी करीत असताना पोलिस कमिशनर नगराळे, जॉइंट कमिशनर नांगरे पाटील हे दोघेही मराठी अधिकारी आहेत. नांगरे पाटील व मंडळी या जाकीटधारींना एवढे का घाबरता ? त्यांचा कोप झाला तर तुमची चूल पेटणार नाही, अशी तुमची अवस्था नाही! महाराष्ट्रातील सात लाख पोलिसांचे तुम्ही नेते आहात! . नांगरे पाटील तर गल्लीगल्लीत जावून स्पर्धा परीक्षेसाठी तरुणांना सल्ला देतात व मृगजळ दाखवतात ! आयपीएस बनून काय एसीरूममध्ये दडून बसायचे ? नांगरे पाटील व मंडळींची आयपीएस असोसिएशन आहे, लॉबी, माफिया टोळ्या आहेत. कोणतेही पक्षाचे सरकार आले तरी ते त्यांचेच असते पण पोलिस शिपायांना ना असोसिएशन ना लॉबी... मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था. 
   
पोलिस दलात खूप दोष, कमतरता आहे मान्य आहे. पण त्या शिवाय कोणतच सरकार काम करू शकणार नाही. रस्त्यावरचे पोलिस बाजूला करून बघा बर ? समाज उभा राहूच शकणार नाही. दहा हजारापेक्षा जास्त पोलिस कोरोनाग्रस्त झाले. चारशेच्या आसपास यमाने नेले !  हे जाकीटवाले पुढारी पोलिसांना बदनाम करतात, अधिकाऱ्यांना दम भरतात,औषध दडवून महाराष्ट्रातील लोक तडफडून मरावेत याची वाट बघतात.

इंग्रजांनी आमच्याकडे आयपी (I P)अधिकारी निर्माण केले त्यातून आयपीएस आले, तसे त्यांच्याकडे आयपीएस सारख्या वेगवेगळ्या रॅक नाहीत. प्रत्येक पोलिस हा कॉन्स्टेबल या दर्जाला भरती केला जातो व त्यातूनच कमिशनर किंवा चीफ कॉन्स्टेबल बनतो. फडणवीसांच्या जॅकेटमध्ये काय दडलंय तसेच हे आयपीएस अधिकारी कच का खातात ते पाहणं मनोरंजक ठरेल ! आजच नव्हेतर यापुढेही रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांचे मनोधैर्य उच्च दर्जाचे असणे महत्त्वाचे आहे.
"Treat a man as he is and he will remain as he is. Treat a man as he could be and he will become as should be!
पोलिसांना वाईट वागवले तर ते वाईट बनतील. ते जसे असायला पाहिजे तसे वागविले तर चांगले बनतील ! पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम त्यांचे वरिष्ठ अधिकारी करू शकतात. म्हणून तूर्तास एवढाच सल्ला की,
 "विश्वास नांगरे पाटील (व मंडळी ) 
भिऊ नकोस ! राज्य घटना तुझ्या पाठीशी आहे!
-सुरेश खोपडे

Edited by: : Mangesh Mahale
(सुरेश खोपडे यांनी फेसबूक पोस्टमध्ये काही असंसदीय शब्द वापरले आहेत. ते या बातमीत वगळ्यात आले आहेत.) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com