'या' कंपनीचा "एनसीडी' खुला झाल्यानंतर तीन मिनिटांत इश्यू सबस्क्राईब

पतंजलीच्या आयुर्वेद आधारित उत्पादनांच्या आणि इतर उत्पादनांच्या मागणीत सद्यस्थितीत तिपटीने वाढ झाली आहे.
ramdev baba
ramdev baba

मुंबई : कोराना संकटात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत. आयुर्वेदआधारित उत्पादनांची मागणी वाढली आहे. कारण त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पतंजलीच्या आयुर्वेद आधारित उत्पादनांच्या आणि इतर उत्पादनांच्या मागणीत सद्यस्थितीत तिपटीने वाढ झाली आहे. उत्पादनांना बाजारात मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या पुरवठा आणि वितरण साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पावरील दबावदेखील वाढला आहे. या पुरवठा आणि वितरण साखळीच्या आणि उत्पादन क्षमतेच्या सक्षमीकरणासाठी कंपनी "एनसीडी'द्वारे उभारलेल्या भांडवलाचा वापर करणार असल्याचे पतंजली आयुर्वेदकडून सांगण्यात आले आहे. 

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) माध्यमातून 250 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. "एनसीडी' खुला झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत तो पूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे. पतंजलीच्या "एनसीडी'ला ब्रिकवर्कने "एए'चे पतमानांकन दिले आहे. या "एनसीडीच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा उपयोग पतंजली आयुर्वेद, कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी आणि "वर्किंग कॅपिटलसाठी'च्या तरतूदीसाठी आणि पुरवठा साखळीच्या (सप्लाय चेन नेटवर्क) सक्षमीकरणासाठी करणार आहे.

उद्योगाच्या किंवा कंपनीच्या विविध गरजा भागवण्यासाठी, योजना राबवण्यासाठी आणि कामकाज सुरू ठेवण्यासाठी खेळत्या किंवा कार्यान्वित भांडवलाची आवश्यकता असते. पतंजली या "एनसीडी'च्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर उत्पादन क्षमतेपासून वितरण क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पतंजली आयुर्वेदने दिवाळखोर झालेल्या रुची सोयाचे संपादन केले होते. पतंजली आयुर्वेदने 4 हजार 350 कोटी रुपयांना रुची सोयाला विकत घेतले होते. रुची सोया ही कंपनी फूड प्रॉडक्ट्स बनवते. न्युट्रेला हा ब्रॅंड रुची सोयाचाच आहे. दिवाळखोरी आणि नादारीच्या कायद्याअंतर्गत (आयबीसी) रुची सोयाचे संपादन पतंजली आयुर्वेदने केले होते.
 
"सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंद्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. बहुतांश उद्योगांना भांडवलाची आवश्यकता भासते आहे. पतंजली आयुर्वेदच्या "सप्लाय चेन नेटवर्क'ला मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे. 

हा पहिलाच  "एनसीडी' इश्यू 

पतंजली आयुर्वेद ही हरिद्वारस्थित कंपनी आहे. पतंजली आयुर्वेदच्या "एनसीडी कुपन रेट' 10.1 टक्के आहे. या एनसीडीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. 28 मे 2023 रोजी मुदतपूर्ती आहे. शेअर बाजारात नोंदणी झालेले "एनसीडी' रिडिमेबल आहेत म्हणजेच गुंतवणूकदार त्यातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. पतंजली आयुर्वेदचा हा पहिलाच "एनसीडी' इश्यू आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com