शिक्षण विभागाचा खेळ थांबवा : भाजपच्या प्रतिक कर्पे यांची मागणी - Stop the education department's game: BJP's Prateek Karpe's demand | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शिक्षण विभागाचा खेळ थांबवा : भाजपच्या प्रतिक कर्पे यांची मागणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

ऑनलाईन शिक्षणाचा लाभ जेमतेम 12 ते 18 टक्के विद्यार्थ्यांना मिळत असल्याचा अनेक शाळांचा अनुभव आहे. त्यामुळे उरलेला मुलांना ज्ञान कसे मिळणार असा प्रश्नही कर्पे यांनी विचारला आहे. 

मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षे राज्यात शिक्षण विभागाने चालवलेला मनमानी कारभार हा सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेला छेद देणारा आहे. विद्यार्थी हितविरोधी आणि मराठीची अवहेलना करणारा हा कारभार त्वरित थांबवावा, अशी मागणी महापालिकेतील भाजपचे शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

शाळा बंद असल्याने सध्या शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत आहे, मात्र गरीब विद्यार्थ्यांना इंटरनेट किंवा स्मार्टफोन परवडत नाहीत. विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबमध्ये कित्येक तांत्रिक अडचणी आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ जेमतेम 12 ते 18 टक्के विद्यार्थ्यांना मिळत असल्याचा अनेक शाळांचा अनुभव आहे. त्यामुळे उरलेला मुलांना ज्ञान कसे मिळणार असा प्रश्नही कर्पे यांनी विचारला आहे. 

खासगी शाळा आणि खासगी महाविद्यालयांनी शुल्क कमी न करता उलट ग्रंथालय, जिमखाना आणि इतर न दिलेल्या सुविधांची शुल्क आकारणी केली. कोविड काळात सरकारने विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आर्थिक पॅकेज घोषित केले नाही. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या पदभरतीत मराठी माध्यमातून शालेय शिक्षण झाले असल्याने शेकडो उमेदवारांना नोकरी नाकारण्यात आल्याचेही कर्पे यांनी दाखवून दिले.

मराठी भाषेवरचे प्रेम दिवसेंदिवस आटत जात असल्याचा दाखला म्हणजे राज्य सरकारने उर्दू घरांसाठी केलेली कोट्यावधींची तरतूद. महापालिकेच्या शिक्षण विभागात फक्त 15 टक्के भरती झाल्याने त्यांचा ढिसाळ कारभार दिसून येतो. शासकीय शाळांमध्ये दिलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे  दररोज परीक्षण कसे केले जाते ? शासकीय शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती तरतूद केली आहे ? आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांची जर ही स्थिती असेल तर उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय शाळांची  काय स्थिती असेल याची कल्पना कोणालाही करता येईल. मग हे शासन मातृभाषेतील शिक्षणाला नेमके प्रोत्साहन देत आहे का, असाही प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 

शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच खेळ सुरु आहे. विद्यार्थीदशेतील या महत्त्वाच्या वर्षांमध्ये अशा गोष्टी घडल्या तर हे विद्यार्थी पुढे घडणार तरी कसे ? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक अशा थोर समाजधुरीणांनी घडवलेल्या परंपरेला तुमचे सरकार छेद देत आहे. त्यामुळे या विषयाकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही कर्पे यांनी म्हटले आहे.

 

हेही वाचा...

बंडा तात्यांना अटक करून सरकारने काय साधले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख