भारताच्या प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारणार !  - A statue of Balasaheb will be erected near the entrance of India! | Politics Marathi News - Sarkarnama

भारताच्या प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारणार ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बनविण्याचे काम गेले वर्षभर सुरू होते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहाणी केली. जोगेश्वरी येथील मातोश्री क्‍लबच्या मैदानात या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलीय. 

कुलाबा गेट वे आँफ इंडिया जवळील रिगल सिनेमा सर्कलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा बसवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. शिल्पकार शशिकांत वडके यांनी गेल्या वर्षभरापासूून या पुतळा निर्मीतीचं काम केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या पुतळ्याची पहाणी केली. त्यावेळी शिल्पकार शशिकांत वडके यांना त्यांनी काही तांत्रिक सुचनाही केल्या आहेत. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. उत्तम व्यंगचित्रकार, फर्डे वक्ते म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. 1966 मध्ये स्थापना केलेली शिवसेना आज 54 वर्षाची आहे. 1995 मध्ये बाळासाहेबांनी विधानसभेवर भगवा फडकवून दाखविला. शिवसेना-भाजप युतीने कॉंग्रेसचा धुव्वा उडवित सत्ता खेचून आणली होती. युतीचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी निवड करण्यात आली. पुढे जोशींना बदलून नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यात आले होते. 

त्यानंतर युतीला पंधरावर्षे सत्ता मिळाली नाही. मोदी लाटेत भाजपला फायदा झाला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. शिवसेना काही खाती घेऊन मंत्रिमंडळात राहिली खरी पण, ती नाराज होती. कारण मोदी लाटेचा फायदा उचलच भाजपने शिवसेनेशी युती तोडली होती. सत्तेसाठी ते पुन्हा एकत्र आले होते. 

2019 मध्ये मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने भाजपबरोबर जाण्याचे नाकारले आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय झाला. आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बनविण्याचे काम गेले वर्षभर सुरू होते. आता बाळासाहेबांचा पुतळा मुंबईत उभा राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचे पुत्र आहे. या पुतळ्याच्या अनावरणाला कोणत्या बड्या नेत्याला बोलविले जाते याकडेही महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा उभा राहत असल्याने शिवसैनिकांमध्ये आणि मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबईत मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मराठी माणसाला बाळासाहेबांचा म्हणूनच अभिमान वाटतो. प्रत्येकाला बाळासाहेबांचा पुतळा डोळेभरून पाहण्याची म्हणूनच प्रतीक्षा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख