पुणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजे शनिवारी (ता.23) होत आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर किशोरी पेडणेकर आहेत.
शरद पवार यांच्या संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये भाजपची मुसंडी https://t.co/HoOUbUuOox
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 20, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्रउद्योगमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित राहणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा फोर्टमध्ये उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयासमोरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे.
ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.
हा पुतळा 9 फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनवण्यात आला आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱयावर बसवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. ता. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आहे.
Edited by : Mangesh Mahale

